जळगाव : माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजकीय वादळानंतर नव्या उत्साहाने पुनरागमन केले आहे. विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने ते चांगलेच अडचणीत सापडले होते. शेतकरी आणि विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर त्यांची कृषिमंत्रीपदावरून उचलबांगडी झाली. आता त्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, रविवारी (दि. 17) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मेळाव्यात माणिकराव कोकाटे यांनी हजेरी लावली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ठामपणे सांगितले, रात गई, बात गई… आता नवी इनिंग जोरदार खेळणार. कृषिमंत्री असताना माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. यामुळे त्यांचा जळगाव दौराही रद्द झाला होता, ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले. याबाबत विचारले असता कोकाटे म्हणाले, “पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे दौरा रद्द झाला होता. पण आज मी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यासोबत जळगावच्या संपर्क मंत्रिपदाच्या नात्याने या मेळाव्यासाठी उपस्थित आहे. आज येथे मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार असून, माझे कर्तव्य मी पार पाडत आहे, असं माणिकराव कोकाटे म्हणाले. मागे काय झाले, त्यात खोलात जाण्याची गरज नाही कृषिमंत्रीपदाच्या काळातील टीकेला उत्तर देताना कोकाटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. रात गई, बात गई! मागच्या गोष्टी उकरून काढण्यात अर्थ नाही. आता पुढे जायचे आहे. लोकांना न्याय कसा देता येईल, यावर लक्ष देऊ, असे त्यांनी ठणकावून सांगितले. नव्या क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रिपदाच्या जबाबदारीबाबत विचारले असता, त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले, नवी इनिंग जोरदार खेळणार! तुम्ही काळजी करू नका, एकदम धमाकेदार काम करणार, असं कोकाटे यांनी ठणकावून सांगितलं. अजित पवारांचा जळगाव दौरा उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्यात पक्षाच्या संघटनात्मक कामांचा आढावा घेण्यासाठी प्रथमच दौऱ्यावर आले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. रविवारी, 17 ऑगस्ट 2025 रोजी अजित पवार जळगाव शहरात शासकीय कामांसह राजकीय बैठका आणि मेळाव्यांना उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यात काँग्रेसच्या प्रतिभा शिंदे आणि काही सरपंचांसह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. पक्षातील फुटींनंतर अजित पवारांचा हा पहिलाच जळगाव दौरा असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.