Nigeria Boat Capsize : नायजेरियात प्रवासी बोट बुडाल्याने मोठी दुर्घटना; 25 जण बुडाल्याची शक्यता

अबुजा, (नायजेरिया) : नायजेरियाच्या उत्तर-मध्य भागात एक प्रवासी बोट बुडून किमान २५ जण बुडाल्याची भीती व्यक्त होते आहे. शनिवारी निगेर प्रांतातल्या शिरोरो भागातल्या गुमू गावाजवळ शनिवारी ही दुर्घटना घडली, असे राष्ट्रीय आपत्कालिन वयवस्थापन संस्थेचे पदाधिकारी इब्राहिम हुसेन यांनी सांगितले. बुडालेल्या प्रवाशांचा शोध आणि बचावकार्य सुरू आहे. मात्र या भागावर सशस्त्र गटांचे नियंत्रण असल्यामुळे हे मदत आणि बचाव कार्य मर्यादित स्वरुपात सुरू आहे.
या दुर्घटनेत मरण पावणाऱ्यांची संख्या यापेक्षाही जास्त असू शकते, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. सशस्त्र गटांच्या हल्ल्यांचा धोका असल्यामुळे या भागात फारच थोडे लोक जाऊ शकतात. या गटांनी अलिकडच्या महिन्यांमध्ये उत्तर-मध्य भागातील हल्ल्यांचे प्रमाण वाढवले आहे. त्यामुळे मदतकार्य खूप अवघड झाले आहे. नायजेरियामध्ये यापुर्वीही जलमार्गामध्ये अशा दुर्घटना घडल्या आहेत.
दुर्गम भागातील समुदायांमध्ये अशा घटना नेहमीच घडत असतात. विशेषतः पावसाळी दिवसात प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी जुन्या आणि जीर्ण झालेल्या बोटींमधून प्रवास करताना अशा घटना घडत असतात. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, वायव्येकडील झामफारा राज्यातील एका नदीत शेतकऱ्यांना घेऊन जाणारी एक बोट उलटल्याने किमान ४० लोक बुडाले होते. २०२४ मध्ये नायजेरियात बोटीच्या अपघातात किमान ३२६ लोकांचा मृत्यू झाला होता.





