पिंपरी | पीएमपीची निगडी ते सुदुंबरे बससेवा सुरू

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहरापासून केवळ बारा किलोमीटर अंतरावर वसलेल्या तीर्थक्षेत्र सुदुंबरे गावात पीएमपीची बससेवा अखेर सुरु झाली आहे. त्यामुळे स्थानिकांसह चाकरमान्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. रविवारपासून (दि. 23) सुदुंबरे गावाकरिता यिमित बससेवा सुरू करण्यात आली आहे.
ही बस गावात पोचताच सुदुंबरे ग्रामपंचायतीच्या वतीने या पीएमपी बसचे स्वागत करण्यात आले. सरपंच मंगल गाडे यांनी यांनी बसला हार अर्पण करत नारळ वाढवून या बसमार्गाचे उद्घाटन केले.
यावेळी उपसरपंच बापूसाहेब बोरकर, माजी उपसरपंच ताराचंद गाडे, सुरेश गाडे, अभियंते शैलेंद्र चव्हा, उद्योजक कालिदास गाडे,, उद्योजक विजय गुंजाळ, संताजी महाराज मंदिराचे व्यवस्थापक चंद्रकांत जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
सुदुंबरे गावात केंद्र सरकारचे महत्वपूर्ण एनडीआरएफ केंद्र आहे. सिद्धांत कॉलेज नावाची मोठी शैक्षणिक संस्था येथे आहे. हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी पिंपरी चिंचवड आणि मावळ तालुक्यातून येथे येत असतात. तसेच चाकण आणि तळेगाव एमआयडीसीत कामाला जाणारा मोठा कामगार वर्ग देखील याच गावातून ये-जा करीत असतो.
याशिवाय गावालगत भंडारा डोंगर, सुदवडी, वासुली, भांबोली आणि इतर गावांच्या सीमा आहेत. याठिकाणच्या नागरिकांची सुदुंबरे गावातूनच ये-जा असते. गेल्या अनेक वर्षांपासून गावात येण्यासाठी थेट पीएमपी बस नसल्यामुळे लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
त्यामुळे या गावात पीएमपी बससेवा सुरू करावी, अशी मागणी होत होती. अखेरीस त्याला यश आले आहे. ही ई-बस निगडीहून देहूरोड मार्गे गावात येईल. येथील सिद्धांत कॉलेजसमोर तिचा थांबा असेल. दोन्हीच्या मिळून एकूण 32 खेपा बसच्या होणार आहेत.





