पिंपरी | निगडी ते पिंपरी मेट्रोचे काम सुरू

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना स्वारगेटपर्यंत विनासायास प्रवास पुढील काही वर्षात करता येणार आहे. सध्या पिंपरीहून सिव्हिल कोर्टापर्यंत मेट्रोची सेवा सुरू असून पिंपरी ते भक्ती शक्ती निगडी चौकापर्यंत विस्तारित मेट्रोसाठी खोदकामाला सुरुवात झाली आहे. तीन टप्प्यांत हे काम पूर्ण होणार आहे. काम पूर्ण झाल्यावर प्रवाशांचे निगडी प्राधिकरणातून मेट्रोने प्रवास करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.
निगडीतील भक्ती-शक्ती चौकात मेट्रोच्या खोदाई या कामाला सुरुवात करण्यात आली असून भक्ती-शक्ती चौक आणि पवळे पुलाजवळ बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. महामेट्रोकडून भक्ती-शक्तीसह मार्गावरील रस्त्याचे सुरुवातीला माती परीक्षण करून ले-आउट तयार करणार आहे. त्यानंतर पिलर बांधण्याचे काम सुरू होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडी या विस्तारित मार्गाला केंद्र सरकारने २३ ऑक्टोबर २०२३ रोजी मान्यता दिली.
पुणे महामेट्रोने पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडीपर्यंतच्या मार्गाच्या विस्तारीकरणाची निविदा निविदा प्रक्रियेचे काम पूर्ण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन ६ मार्च रोजी या विस्तारित मार्गाचे भूमिपूजन केले होते. या मार्गाची लांबी ४.५१ किलोमीटर असून या मार्गिकेचा खर्च ९१०.१८ कोटी इतका आहे. या विस्तारित मार्गाचे काम तीन वर्षात पूर्ण करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे.
चार स्थानकांचे अंतर
या मार्गावर चिंचवड, आकुर्डी, निगडी प्राधिकरण आणि भक्ती-शक्ती चौक या स्थानकांचा समावेश असणार आहे. त्यात महापालिका ते चिंचवड स्थानकातील अंतर १.४६३ किलोमीटर, चिंचवड ते आकुर्डी स्थानकांतील अंतर १.६५१ किलोमीटर, आकुर्डी ते निगडी स्थानकांतील अंतर १.०६२ किलोमीटर आणि निगडी स्थानक ते भक्ती शक्ती चौक स्थानकांतील अंतर ९७५ मीटर असणार आहे.
निगडीपर्यंत मेट्रोची नागरिकांची मागणी
पुणे महामेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यात मोरवाडी पिंपरी ते फुगेवाडीपर्यंत काम करण्यात आले. त्यानंतर सिव्हिल कोर्टापर्यंत मार्ग पूर्ण करण्यात आला. तेथून पुढे स्वारगेटपर्यंत मार्ग पूर्ण करण्यात आला.
फुगेवाडी ते पिंपरी या मार्गावर ६ मार्च २०२२ रोजी तर फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट स्थानक मार्गावर ऑगस्ट २०२३ प्रवासी वाहतूक सुरू झाली. मात्र, स्वारगेट ते पिंपरी महापालिका हा मार्ग पुढे निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत वाढवावा, अशी नागरिकांकडून सातत्याने मागणी केली जात होती.
पिंपरी चिंचवड महापालिका ते निगडीदरम्यान मेट्रो मार्गिकेसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आरव्हीएनएल कंपनीला मेट्रोचे काम देण्यात आले आहे. पुढील ३६ महिन्यात हे काम पूर्ण करणे अपेक्षीत असून बॅरिकेडींच आणि इतर प्राथमिक कामांना सुरवात झाली आहे. – हेमंत सोनवणे, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो.


