निफ्टी 18 हजार अंकांवर स्थानापन्न

मुंबई – करोनाचा जागतिक व्यापारावर फारसा परिणाम होणार नाही असे देश-विदेशातील गुंतवणूकदारांना वाटत आहे. तिसऱ्या तिमाहीचे ताळेबंद सकारात्मक असण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे सोमवारी शेअर बाजारात जोरदार खरेदी होऊन निर्देशांक सलग तिसऱ्या दिवशी वाढले.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 650 अंकांनी उसळून 60,395 बंद झाला. सेन्सेक्स संबंधातील 30 पैकी 20 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 1.07 टक्क्यांनी म्हणजे 190 अंकांनी वाढून 18,003 अंकांवर बंद झाला.
टायटन, मारुती, स्टेट बॅंक, एल अँड टी, एचडीएफसी, कोटक बॅंक या कंपन्यांच्या शेअरचे भाव वाढले.इन्फोसीस, नेस्ले, एशियन पेंट्स, पावर ग्रिड या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. या आठवड्यात टीसीएस व एचडीएफसी बॅंक आपले ताळेबंद जाहीर करणार आहेत.टीसीएस बायबॅक करण्याच्या मनस्थितीत असल्यामुळे कंन्याचे तेळेबंद सकारात्मक असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
आगामी आठवड्यात गुंतवणूकदारांचे कंपन्यांच्या ताळेबंदाकडे लक्ष राहणार आहे. अमेरिकेच्या महागाईची आकडेवारी या आठवड्यात जाहीर होणार आहे. याकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष असेल. भारतीय शेअर बाजाराच्या दृष्टीकोनातून सकारात्मक बाब म्हणजे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार खरेदी करीत आहेत.
शुक्रवारी या गुंतवणूकदाराने 496 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केले असल्याची आकडेवारी शेअर बाजारानी जारी केली. भांडवली वस्तू, रिअल्टी, बॅंकिंग, वाहन, वित्त कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप 1.19 टक्क्यापर्यंत वाढले. सकाळच्या सत्रात रुपयाचे मूल्य 29 पैशाने वाढल्यामुळे गुंतवणूकदारांना खरेदीसाठी पूरक वातावरण मिळाले.




