गुंतवणूक करावी की नाही? निफ्टीने केला ‘हा’ नकोसा विक्रम, 5 महिन्यात 94 लाख कोटी रुपये पाण्यात

Share Market | भारतीय शेअर बाजारातील घसरण सातत्याने सुरू आहे. इक्विटी बाजारातील सततच्या विक्रीमुळे गेल्या 5 महिन्यांत गुंतवणूकदारांचे तब्बल 94 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय, एनएसई बेंचमार्क इंडेक्स असलेल्या निफ्टीने देखील नकोसा विक्रम केला आहे. निफ्टीमध्ये मागील सलग 10 दिवस घसरण सुरू आहे. 1996 नंतर पहिल्यांदाच निफ्टीमध्ये एवढी सलग घसरण दिसून आली आहे.
मंगळवारी (4 मार्चला) बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा इंडेक्स सेन्सेक्स 96 अंकांनी कमी होऊन 72,989 अंकावर बंद झाला. तर निफ्टी सलग दहाव्या सत्रात 36 अंकांनी म्हणजे 0.17% कमी होऊन 22,082 अंकावर बंद झाला. बर्याच वर्षानंतर हा इंडेक्स सलग 10 दिवस कमी झाला.
28 डिसेंबर 1995 ते 10 जानेवारी 1996 या कालावधीमध्ये निफ्टीत सलग 10 दिवस घसरण सुरू होती. त्यानंतर आता सलग घसरण दिसून आळी आहे. म्हणजेच, निफ्टीने घसरणीचा 29 वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे.
सप्टेंबर 2024 मधील आपल्या उच्चांकापासून सेन्सेक्स आणि निफ्टी दोघेही 16 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. 2025 मध्येच बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी 7 टक्क्यांपर्यंत कोसळले आहेत. यामुळे मागील 2 महिन्यातच गुंतवणूकदारांना जवळपास 62 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
फेब्रुवारी 2025 हा कोविड-19 महामारीनंतरचा भारतीय शेअर बाजारासाठी सर्वात वाईट महिना ठरला. या कालावधीत इक्विटी बेंचमार्क इंडेक्स जवळपास 6% पर्यंत घसरले आणि गुंतवणूकदारांना 40 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
शेअर बाजारातील घसरणीचे कारण काय?
अमेरिकेच्या टॅरिफ संदर्भातील वाढत्या आर्थिक अनिश्चिततेचा नकारात्मक परिणाम जागतिक बाजारावर झाला आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारालाही याचा फटका बसत आहे. याशिवाय, गेल्या काही काळात भारतीय बाजारावर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (FII) सततच्या विक्रीचा परिणाम दिसून येत आहे.





