Saswad : वृत्तपत्र विक्रेत्याची कन्या झाली ‘एमडी’ डॉक्टर
Saswad :अत्यंत सामान्य आणि कष्टाळू पार्श्वभूमीतून आलेल्या प्रणाली यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल सासवड शहर आणि परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

गराडे : सासवड (ता.पुरंदर) येथील वृत्तपत्र व नारळाचे व्यावसायिक गणेश शरद चौधरी आणि स्मिता चौधरी यांची कन्या डॉ. प्रणाली चौधरी यांनी वैद्यकीय क्षेत्रात यश संपादन केले आहे. मुंबई येथील नायर हॉस्पिटल वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी ‘डॉक्टर ऑफ मेडिसिन’ (एमडी) ही पदवी प्राप्त केली आहे. सध्या त्या याच रुग्णालयात सेवा बजावत आहेत. अत्यंत सामान्य आणि कष्टाळू पार्श्वभूमीतून आलेल्या प्रणाली यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल सासवड शहर आणि परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
त्यांचे शालेय शिक्षण सासवडच्या वाघिरे हायस्कूलमध्ये झाले असून, शालेय जीवनापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या प्रणाली यांनी आपले एमबीबीएसचे शिक्षण अहिल्यानगर येथील विठ्ठलराव विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालयातून प्रथम श्रेणीत पूर्ण केले होते. त्यानंतर मुंबईच्या नायर हॉस्पिटलमधून एम.डी. पदवी संपादित करत वैद्यकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. गणेश चौधरी हे सासवडमध्ये अनेक वर्षांपासून वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करत आहेत. वृत्तपत्र वितरणाच्या या व्यवसायासोबतच त्यांचा अमर चौकात नारळ विक्रीचाही व्यवसाय करत आहेत. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सामान्य असताना आणि वडिलांनी केलेला संघर्ष पाहून डॉ. प्रणाली यांनी कधीही आपल्या जिद्दीला खचू दिले नाही.





