वाघोली : जुन्या समस्यांवर बसणार नवीन घाव?

वाघोली (दत्तात्रय गायकवाड) – वाघोली (तालुका हवेली) येथे ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या अनेक समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रयत्न करण्यात आले आहेत. या समस्या काही प्रमाणात सोडण्यासाठी ग्रामपंचायत यशस्वी झाली आहे. मात्र तरीही भौगोलिक विस्तार निधी तसेच शासकीय परवानग्या आदी कारणांमुळे लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून देखील काही समस्या वाघोली करांच्या मनात घर करून बसल्या आहेत.
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत गाव समाविष्ट झाल्यानंतर या समस्या सोडविण्यात येतील अशी आशा स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. यामध्ये पिण्याचे पाणी सांडपाणी व्यवस्थापन तसेच कचऱ्याची समस्या यांचा समावेश आहे. पुणे महानगरपालिका ह्या समस्या सोडवण्यात कितपत पुढाकार घेते आगामी काळात पहावे लागेल.
पाणी प्रश्न – वाघोली मध्ये सध्या पाण्याची गंभीर समस्या असून पूर्वी वाघोली ग्रामीण पाणी पाणीपुरवठा योजना दिवसाला 25 लाख लिटर पाणी या योजनेमधून गावाला मिळत होते. त्यानंतर पीएमआरडी कडून 22 कोटी निधी उपलब्ध करून यामध्ये वाघोली व आव्हाळवाडी या गावांसाठी दिवसाला 50 लाख लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. परंतु तरीही वाघोली ची पाणी समस्या सुटणार नाही, कारण वाघोली ची लोकसंख्या दोन लाखाच्या वर गेली असून अंदाजे प्रतिव्यक्ती दिवसाला 140 लिटर पाणी लागते. वाघोली चा पाणी प्रश्न हा महानगरपालिके मध्ये समाविष्ट झाल्यानंतर भामा-आसखेडचे पाणी ज्यावेळेस वाघोली मध्ये येईल त्यावेळेस बऱ्यापैकी पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल.
सध्या च्या परिस्थिती मध्ये वाघोली मध्ये पाण्यावरती मोठ्या प्रमाणात मेंटेनन्स द्यावा लागतो. भामा-आसखेडचे पाणी आल्यानंतर सोसायटीचा मेन्टेनन्स कमी होणार आहे.
सांडपाण्याचा प्रश्न – वाघोली गावांमध्ये अनेक ठिकाणी ड्रेनेजचे काम प्रगतिपथावर असून सध्या सोसायटीमध्ये एसटीपी चा खर्च मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याचा भुर्दंड सोसायटीतील राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मेंटेनन्स च्या रूपाने द्यावा लागत आहे. त्यामुळे ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर यामध्ये सोसायटींना व स्थानिक नागरिकांना मेंटेनन्स च्या रकमेतून मोठा दिलासा मिळणार आहे.
वाघोली मध्ये सध्या वार्ड क्रमांक एक मध्ये ड्रेनेजचे कामचे प्रगतीपथावर आहे.
वार्ड क्रमांक दोन मध्ये ड्रेनेजचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. वार्ड क्रमांक 3 मध्ये ड्रेनेजचे जवळपास काम 80 टक्के झालेले आहे. वार्ड क्रमांक चार मध्ये ड्रेनेज काम प्रगतीपथावर आहे.वार्ड क्रमांक पाच मध्ये ड्रेनेज चे काम चालू आहे. वार्ड क्रमांक सहा मध्ये ड्रेनेजचे काम नियोजन बद्ध करून ड्रेनेज लाईन ही नदीपर्यंत नेलेली आहे. यामुळे या भागातील स्थानिक व सोसायटीमध्ये नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
कचरा प्रश्न – वाघोली मध्ये कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून अनेक रस्त्यांवर रस्त्याच्या लगत कचरा पडलेला दिसत आहे. ग्रामपंचायत कार्यकारणी गेल्या दोन वर्षापासून कचरा प्रकल्पाला परवानगी मिळावी यासाठी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा करत आहे. परंतु सदर परवानगी लालफितीत अडकलेली असून महानगरपालिकेमध्ये गाव जर गेले तर या ठिकाणी कचरा चे प्रकल्प कार्यान्वित होऊ शकतो.
“वाघोली गाव महानगरपालिका मध्ये समाविष्ट झाल्यानंतर मुख्य समस्या पाणी , कचरा , ड्रेनेज यामुळे स्थानिक व सोसायटी धारक यांना जो भुर्दंड बसतो मोठ्या प्रमाणात मेन्टेनन्स रक्कम द्यावी लागते. यासाठी भामा-आसखेडचे पाणी वाघोली गावासाठी आणण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. मुबलक पाणीपुरवठा वाघोली साठी उपलब्ध झाल्यास स्थानिक व सोसायटी धारक यांचा मोठ्या प्रमाणात खर्च वाचणार आहे.” – संदीप सातव (माजी उपसरपंच, वाघोली ग्रामपंचायत)
“वाघोली मधील पिण्याच्या पाण्याचा, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन तसेच इतर समस्या जास्तीत जास्त निधी द्वारे लवकरात लवकर सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीचा पुणे महानगर पालिकेत समावेश होत आहे. राज्य सरकार व पुणे महानगरपालिका यांच्या माध्यमातून वाघोलीतील अनेक समस्या जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून सोडविण्यात येणार आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून दूरदृष्टी ठेवून लोक हिताचे अनेक निर्णय घेण्यात येणार आहे.” ॲड. अशोक पवार – (आमदार, शिरूर – हवेली विधानसभा मतदारसंघ)





