नवी दिल्ली – यूएपीए अंतर्गत ईशान्य दिल्ली दंगलीच्या खटल्यात त्यांच्या अशीलाविरोधात दाखल केलेले आरोपपत्र त्याला सांप्रदायिक म्हणून दर्शवते. तथापि, हा अहवाल तयार करणारा अधिकारी आणि त्याचे मन सांप्रदायिक होते, असे जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदच्या वकिलाने आज (शुक्रवार) दिल्ली न्यायालयात सांगितले.
वरिष्ठ वकील त्रिदीप पैस यांनी उमर खालिदच्या बाजूने युक्तिवाद केला. ज्यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमिताभ रावत यांना सांगितले की, आरोपपत्र दूरचित्रवाणी वाहिनीच्या एखाद्या स्क्रिप्टसारखे वाटत होते.तसेच पोलिसांचा अंतिम अहवाल हा बकवास आहे. त्यामुळे याप्रकरणात कुणालाही अटक करण्यात येऊ नये, असाही त्यांनी युक्तीवाद केला.
तर, दिल्लीत झालेल्या दंगलींबाबत पोलिसांच्या दाव्यात अनेक विसंगती असून हे आपल्याविरुद्ध “रचलेले’ प्रकरण आहे, असे ईशान्य दिल्लीतील दंगलींचा कट रचल्याबद्दल बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली (यूएपीए) अटक करण्यात आलेला जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याने सोमवारी दिल्लीतील एका न्यायालयाला सांगितले होते.
दरम्यान, ईशान्य दिल्लीत फेब्रुवारी 2020मध्ये झालेल्या हिंसाचारात 53 जण ठार, तर सातशेहून अधिक लोक जखमी झाले होते. या दंगलींचे “सूत्रधार’ असल्याच्या आरोपाखाली इतर अनेकांसह खालिदवर यूएपीए या कठोर दहशतवादविरोधी कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.