Suman Kale Death Case : सुमन काळे मृत्यू प्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
Suman Kale Death Case : फेरतपास किंवा एसआयटीच्या नियुक्तीबाबत सकारात्मक प्रतिसाद

Suman Kale Death Case : पारधी समाजाच्या समाजसेविका स्व. सुमन काळे यांच्या कथित पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणात न्याय मिळावा, या मागणीसाठी पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ९ जून २०२६ रोजी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भटके विमुक्त विकास परिषदेचे महाराष्ट्र राज्य प्रांत कार्यकारिणी सदस्य अशोक तिडके यांनी ही माहिती दिली.
पारधी समाजावरील गुन्हेगारीचा शिक्का पुसण्यासाठी आणि समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्व. सुमन काळे यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले होते. आत्मसमर्पण मेळाव्यांच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना नवे आयुष्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पोलिसांनी बेकायदेशीर ताब्यात घेऊन अमानुष मारहाण केली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी व समाजातील विविध संघटनांनी केला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी सुमन काळे यांनी पतीच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा केला होता. तसेच त्यांच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०९ अंतर्गत आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र, हा बनाव असल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला.
मुख्यमंत्र्यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात स्व. सुमन काळे यांचे बंधू गिरीश चव्हाण, पुत्र साहेबा काळे, विवेक विचार मंचचे राज्य संयोजक प्रा. सागर शिंदे, भटके विमुक्त विकास परिषदेचे अशोक तिडके आणि विवेक विचार मंचचे प्रांत संयोजक निलेश धायरकर यांचा समावेश होता.
यावेळी सुमन काळे प्रकरणातील तपासाबाबत उपस्थित झालेल्या संशयास्पद बाबी, तपासातील कथित विलंब आणि पीडित कुटुंबाच्या न्यायाच्या मागणीसंदर्भातील सविस्तर निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. या प्रकरणाचा निष्पक्ष आणि सखोल फेरतपास करण्यात यावा किंवा विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात यावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
या निवेदनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाचा फेरतपास अथवा विशेष तपास पथक नियुक्त करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली.
गेल्या १९ वर्षांपासून न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या स्व. सुमन काळे यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा आणि या प्रकरणातील सत्य समोर यावे, अशी अपेक्षा समाजातील विविध घटकांकडून व्यक्त केली जात आहे.





