राज्य सरकारचा निर्णय : दहावीचा भूगोलाचा पेपर अखेर रद्द …

नववी आणि ११वी च्या परीक्षा रद्द; लॉकडाउन वाढल्याने शालेय शिक्षण विभागाने घेतला निर्णय
मुबंई : करोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सुरुवातीला १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. आता मात्र हा लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या शिक्षण खात्याने मोठा निर्णय घेतला आहे.
राज्यातील नववी आणि ११ वीच्या परीक्षाच रद्द करण्यात आल्या आहेत. या शिवाय, दहावीच्या भूगोल आणि कार्यशिक्षण यांचेही पेपर रद्द करण्यात आले आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. त्यांनी एका व्हिडिओद्वारे या निर्णयांची घोषणा केली.
कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आम्ही इयत्ता 9 वी आणि 11 वीच्या दुसर्या सेमिस्टर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, आम्ही दहावीसाठी न सोडविलेली शेवटची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.@CMOMaharashtra @bb_thorat @AUThackeray @SATAVRAJEEV @AjitPawarSpeaks pic.twitter.com/0zcKbxzWc0
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) April 12, 2020
त्या म्हणाल्या की, “राज्यातील नववी आणि ११ वीच्या परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठवण्यासाठी पहिल्या सत्राचा आधार घेतला जाणार आहे. पहिल्या सत्रात झालेल्या चाचण्या आणि प्रात्याक्षिके व अंतर्गत मूल्यमापन करून या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेण्यात येईल. याशिवाय इयत्ता दहावीच्या भूगोल आणि कार्यशिक्षण यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या संदर्भातील निर्देश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला देण्यात आले आहे.”





