Sovereign Gold Bond : 11 ते 15 सप्टेंबरपर्यंत स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी

मुंबई : तुम्ही पैसे गुंतवणूकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या सार्वभौम गोल्ड बाॅंड योजनेचा चांगला पर्याय आहे. RBIने आर्थिक वर्ष 2023-24 साठी सार्वभौम गोल्ड बाँडची दुसरी मालिका जारी केली आहे. त्याअंतर्गत तुम्हाला बाजारभावापेक्षा कमी किंमतीत सोने खरेदी करता येणार आहे.
आरबीआयच्या या योजनेचा लाभ तुम्ही 11 सप्टेंबर ते 15 सप्टेंबरदरम्यान घेऊ शकता. या योजनेअंतर्गत ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पर्यायाने तुम्ही सोने खरेदी करू शकता. सार्वभौम गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूकदार 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्यात गुंतवणूक करतात म्हणजेच 99.9 टक्के शुद्ध सोन्यात गुंतवणूक करता येते.
आरबीआयने 8 सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी केली आहे. आरबीआयने सार्वभौम गोल्ड बाँड योजनेच्या दुसऱ्या मालिकेसाठी सोन्याची किंमत 5,923 रुपये प्रति ग्रॅम ठेवली आहे. तुम्ही प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन 99.9 टक्के शुद्ध सोने खरेदी करू शकता. ऑनलाइन खरेदी केल्यास 50 रुपये प्रति ग्रॅमची सूट दिली जाईल.
यामुळे किंमत कमी होऊन 5,873 रुपये प्रति ग्रॅम होईल. या योजनेंतर्गत गुंतवणूक केल्यास सहामाही आधारावर निश्चित किंमतीवर 2.50 टक्के व्याज दिले जाते. सार्वभौम गोल्ड बाँडचा परिपक्वता कालावधी 8 वर्षांचा आहे. आणि पाच वर्षांनंतर ग्राहकांना यातून बाहेर पडण्याचा पर्याय आहे.
या योजनेच्या दुसऱ्या मालिकेअंतर्गत स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त शेअर बाजारा, एनएसई आणि बीएसईद्वारे स्वस्त सोने खरेदी केले जाऊ शकते. तुम्ही त्यात डीमॅट खात्याअंतर्गत गुंतवणूक करू शकता.
या योजनेअंतर्गत भारतीय रहिवासी, हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF), ट्रस्ट, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्था गुंतवणूक करू शकतात. एका व्यक्तीला एका वर्षात जास्तीत जास्त 4 किलो सोने खरेदी करण्याची परवानगी आहे. तर ट्रस्ट आणि संस्था एका वर्षात 20 किलो सोने खरेदी करू शकतात.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या –
https://www.rbi.org.in/commonperson/Marathi/scripts/faqs.aspx?id=1658



