Shivendraraje Bhonsle: मंत्रीपदानंतरही साधेपणाची जपणूक; शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यशैलीची चर्चा
मंत्रीपदामुळे उपलब्ध होणाऱ्या वाहन ताफा, सुरक्षा व्यवस्था आणि शासकीय सुविधांचा अतिरेक टाळण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

Shivendraraje Bhonsle: सत्ता आणि पद मिळाल्यानंतर जीवनशैलीत मोठे बदल होणे हे आजच्या राजकारणात सर्वसाधारण मानले जाते. मात्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंत्रीपद स्वीकारल्यानंतरही साधेपणा, संयम आणि लोकाभिमुख कार्यपद्धती कायम ठेवत वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा जपत राजकीय कारकीर्द घडविणाऱ्या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुरुवातीपासूनच साधी राहणी आणि सर्वसामान्यांशी थेट संपर्क याला प्राधान्य दिले. मंत्रीपदामुळे उपलब्ध होणाऱ्या वाहन ताफा, सुरक्षा व्यवस्था आणि शासकीय सुविधांचा अतिरेक टाळण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.
स्वतःच्या वाहनातून प्रवास – (Shivendraraje Bhonsle)
सध्या ते बहुतांश वेळा स्वतःच्या वाहनातून प्रवास करत असून, जिल्हा प्रशासनाच्या विनंतीनंतर केवळ एक पायलट कार स्वीकारण्यात आल्याचे सांगितले जाते. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक समन्वय राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असला, तरी अतिरिक्त ताफा आणि दिखाऊ व्यवस्थेपासून त्यांनी दूर राहणे पसंत केले आहे.
राज्यातील विविध विकासकामांच्या पाहणीसाठी सातत्याने दौरे करत असतानाच त्यांनी सार्वजनिक वाहतुकीलाही प्राधान्य दिले आहे. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना ते अनेकदा रेल्वेने प्रवास करत असल्याचे दिसून आले आहे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढावा, इंधन बचत व्हावी आणि पर्यावरण संवर्धनाला चालना मिळावी, या उद्देशाने त्यांनी स्वतःच्या कृतीतून संदेश दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सार्वजनिक वाहतुकीच्या वापराबाबत वेळोवेळी आवाहन केले आहे. त्याच धर्तीवर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रेल्वे प्रवासाला दिलेले प्राधान्य हे सामाजिक बांधिलकीचे उदाहरण मानले जात आहे.
सातारा जिल्ह्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रतिमा ही कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारे, दिखाव्यापासून दूर राहणारे आणि विकासकामांवर लक्ष केंद्रित करणारे लोकप्रतिनिधी अशी आहे. मंत्रीपद मिळाल्यानंतरही त्यांच्या स्वभावात कोणताही बदल झाला नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
लोकाभिमुख नेतृत्वाची छाप –
मतदारसंघातील रस्ते प्रकल्प, सार्वजनिक सुविधा, ग्रामीण भागातील पायाभूत विकास आणि प्रशासनाशी सातत्यपूर्ण संपर्क या माध्यमातून त्यांनी लोकाभिमुख नेतृत्वाची छाप निर्माण केली आहे. राजकीय जीवनातील विविध चढ-उतारांनंतरही त्यांनी कार्यपद्धतीतील सातत्य आणि संयम कायम राखल्याचे मानले जाते.
दरम्यान, पर्यावरण संवर्धन आणि प्लास्टिकमुक्त प्रशासनाच्या दृष्टीनेही त्यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मंत्रालयातील कार्यालय तसेच शासकीय निवासस्थानी एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पाण्याच्या बाटल्यांवर पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय त्यांनी सुरुवातीलाच घेतला. बैठका, कार्यक्रम आणि दैनंदिन वापरासाठी स्टील, काचेच्या अथवा पुनर्वापर करता येणाऱ्या बाटल्यांचा वापर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
मंत्रीपद हे जनतेच्या सेवेसाठी –
याबाबत बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, “मंत्रीपद हे जनतेच्या सेवेसाठी असते, वैयक्तिक वैभवासाठी नाही. सामान्य नागरिकांच्या पैशातून उभारल्या जाणाऱ्या सुविधांचा वापर करताना जबाबदारीची जाणीव असणे आवश्यक आहे. साधेपणा, शिस्त आणि कार्यक्षमतेतून लोकांचा विश्वास संपादन करणे हेच माझे ध्येय आहे.”

Shivendraraje Bhonsle: मंत्रीपदानंतरही साधेपणाची जपणूक; शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यशैलीची चर्चा
त्यांच्या या कार्यशैलीमुळे सामान्य नागरिक, कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रातील अनेकांकडून कौतुक व्यक्त केले जात असून, सत्तेच्या केंद्रस्थानी राहूनही जमिनीशी नाळ कायम ठेवणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.




