सातारा : सातारा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्वी कधीही न मिळणारा पुरेसा निधी भाजप सरकारने उपलब्ध करून दिला आहे. पुढील काळातही शहरातील मूलभूत सुविधा, पायाभूत सुविधा आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणखी भरीव निधी देण्यात येईल. शहराचा कायापालट करण्यासाठी नगराध्यक्ष पदासह भाजपचे सर्व उमेदवार विजयी करा, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आवाहन केले आहे. प्रभाग क्र. 14 मध्ये भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते, तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार जयवंत भोसले व सौ. स्मिता घोडके यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा आयोजित करण्यात आली. या पदयात्रेस नामदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या उपस्थितीत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रभागातील मतदारांशी संवाद साधत राजेंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विरोधकांना ना जनाधार, ना शहराच्या विकासाचे व्हिजन. निवडणुकीपुरते उगवणार्यांनी सातार्यासाठी आजवर काय केले? सातारकरांनी याचा विचार करावा, असे आवाहन नामदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केले. सातारा शहराचा विकास कोणी साधला, प्रश्न कोण सोडवते आणि नागरिकांसोबत कोण कायम उभे राहते, याचा विचार करून प्रत्येक मतदाराने भाजपच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मतांनी विजयी करावे, असेही आवाहन त्यांनी केले.