Shamika Ravi on Rupee Dollar: महागाई सध्या चिंतेचा विषय नाही; डॉलर 100 रुपयांवर गेला तरी तो केवळ एक आकडा – डॉ. शमिका रवी
Shamika Ravi on Rupee Dollar: पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या (EAC-PM) सदस्य डॉ. शमिका रवी यांनी महागाई, रुपयाचे मूल्य आणि भारतीय अर्थव्यवस्थेबाबत भाष्य केले आहे.

Shamika Ravi on Rupee Dollar: पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या (EAC-PM) सदस्य डॉ. शमिका रवी यांनी महागाई, रुपयाचे मूल्य आणि भारतीय अर्थव्यवस्थेबाबत भाष्य केले आहे. सध्या देशातील महागाई नियंत्रणात असून ती कोणतीही गंभीर समस्या नसल्याचे त्यांनी म्हंटले. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया १०० च्या पातळीवर पोहोचला तरी त्याकडे केवळ एक आकडा म्हणून पाहिले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
एएनआय पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत बोलताना डॉ. रवी म्हणाल्या की, भारतीय अर्थव्यवस्था सध्या मजबूत स्थितीत असून महागाईचा दरही नियंत्रणात आहे. त्यामुळे महागाईला मोठे आर्थिक संकट म्हणून पाहण्याचे कारण नाही. उलट, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) किंवा केंद्र सरकारने रुपयाचे मूल्य कृत्रिमरीत्या विशिष्ट पातळीवर राखण्याचा प्रयत्न केल्यास त्यातून अडचणी निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले.
बाजाराला नैसर्गिक पद्धतीने काम करू द्यावे –
रुपयाच्या घसरणीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, चलन बाजारातील चढ-उतार ही सामान्य आर्थिक प्रक्रिया आहे. जागतिक आर्थिक घडामोडी, भांडवली प्रवाह आणि विविध बाजार घटकांच्या आधारे चलनाचे मूल्य बदलत असते. त्यामुळे रुपया-डाॅलर विनिमय दरातील बदलांकडे अनावश्यक भीतीने पाहण्याची गरज नाही.
A chat with @smitaprakash https://t.co/hgSKy6WK1l
— Prof. Shamika Ravi (@ShamikaRavi) June 4, 2026
‘१००’ हा केवळ मानसशास्त्रीय आकडा –
डॉलरच्या तुलनेत रुपया १०० च्या पातळीवर गेल्यास त्याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, या प्रश्नावर डॉ. रवी म्हणाल्या की, “१०० हा फक्त एक आकडा आहे.” लोकांनी या मानसशास्त्रीय टप्प्याला जास्त महत्त्व देऊ नये, असेही त्यांनी सांगितले. चलनाच्या मूल्यामागील आर्थिक घटक अधिक महत्त्वाचे असून केवळ आकड्यांवरून अर्थव्यवस्थेची ताकद मोजता येत नाही, असे त्यांचे मत आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास-
यावेळी त्यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीबाबतही आशावाद व्यक्त केला. जागतिक पातळीवरील अनिश्चितता, पश्चिम आशियातील तणाव आणि विविध आव्हानांनंतरही भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. भारताची आर्थिक पायाभरणी मजबूत असल्याने आगामी काळातही विकासाचा वेग कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कृत्रिम बुद्धिमत्तेचे जागतिक केंद्र बनण्याची क्षमता-
भविष्यातील तंत्रज्ञान क्षेत्राबाबत बोलताना डॉ. रवी यांनी भारताला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात मोठी संधी असल्याचे म्हटले. येत्या काळात भारत हा जगातील AI विकास आणि नवकल्पनांचे नैसर्गिक केंद्र बनू शकतो, असे त्यांनी सांगितले. देशातील मोठी युवा लोकसंख्या, तंत्रज्ञान कौशल्ये आणि वाढती डिजिटल पायाभूत सुविधा यामुळे भारताला या क्षेत्रात आघाडी घेण्याची संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.





