आरएसएसच्या भैय्याजी जोशी यांचा ‘यू-टर्न’: ‘त्या’ वक्तव्याचा राज ठाकरेंनी घेतला समाचार, ‘काड्या घालून नवा संघर्ष…’

मुंबई – मुंबई येथील विद्याविहार येथील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी म्हणाले, मुंबईत विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात. मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकले पाहिजे असे नाही, असे वादग्रस्त विधान केले होते. विशेष म्हणजे त्यांनी हे वक्तव्य महाराष्ट्राचे मंत्री व भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या समोरच केले होते. भैय्याजी जोशी यांनी केलेल्या या विधानाने राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली असून पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा चर्चेत आला आहे. यावरुनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भैय्याजी जोशी यांना खडेबोल सुनावले आहेत.
काय म्हणाले राज ठाकरे?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचे नाही, असे विधान केल्याचे ऐकले. देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून १०६ हुतात्म्यांनी दिलेले बलिदान या सगळ्याबद्दल भय्याजी जोशींना माहीत नसेल असे अजिबात नाही. पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधाने करायची याचं कारण काय ? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
तसेच भय्याजी जोशींनी असेच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावे…. आणि भय्याजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का ? उद्या समजा संघाच्या सोडाच इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असे विधान जर इतर राज्यात केलं असते तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता… भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का? असाही सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
सध्या MMR रिजनमधे चाललेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून सुरवात होताना दिसत आहेत. हे काय चाललय हे न समजण्या इतकी मराठी जनता दुधखुळी नाही हे जोशींनी लक्षात घ्यावे ! हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचे भान पण जोशींनी सोडावे ? आत्ताच कोल्डप्ले नावाचा वाद्यवृंद मुंबईत येऊन गेला , त्याचे मुख्य गायक ख्रिस मार्टिन हे देखील इथे येउन मराठीत बोलून गेले.
त्या ब्रिटिश माणसालाही मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई कोणाची आहे हे समजते तर मग जोशी बुवांना हे समजू नये ? या असल्या काड्या घालून ( अर्थात राजकीय हेतू असल्या शिवाय हे होणे नाही ) नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावे ! बाकी सविस्तर 30 तारखेला गुढीपाडव्याला बोलूच! महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं! असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया –
विधानसभेत जोशी यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात आपली भूमिका मांडली आहे. जोशी यांच्या वक्तव्याचा संदर्भ देताना, महाराष्ट्राची पहिली भाषा ही मराठीच आहे, महाराष्ट्रात येणाऱ्यांनी मराठी शिकलेच पाहिजे, असेही स्पष्ट केले आहे. मी भैय्याजी जोशींचे वक्तव्य ऐकलेले नाही, त्यामुळे ते पूर्ण ऐकून मी त्यावर बोलेन. पण, आमची, सरकारची भूमिका काय आहे तर, मुंबईची, महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र शासनाची भाषा ही मराठीच आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता आले पाहिजे आणि खरं म्हणजे माझ्या वक्तव्याच्या संदर्भात भैय्याजींचे देखील काही दुमत असेल असे मला वाटत नाही, असेही फडणवीसांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले ?
भाषावार प्रांतरचना झाली, आता गल्लीवार प्रांत रचना करत आहे का?, असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला. शिवरायांबद्दल अवमानग्रस्त बोलणाऱ्या प्रशांत कोरटकर यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरटकर चिल्लर माणूस असल्याचे म्हटले. मग, आता भैय्याची जोशी चिल्लर माणूस आहे असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करुन दाखवावे नाहीतर त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीच उद्धव ठाकरेंनी केली आहे. मराठी भाषा आली नाही तरी चालेल म्हणणाऱ्यावर कारवाई करुन दाखवावी. नाहीतर मान्य करावं भाजप आणि संघाचा हा छुपा अजेंडा आहे, अशा शब्दात ठाकरे कडाडल्याचे पाहायला मिळाले.
भैय्याजी जोशी यांचे स्पष्टीकरण –
वादग्रस्त विधान केल्यानंतर भैय्याजी जोशी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, मी केलेल्या एका विधानामुळे गैरसमज झाला आहे असे मला वाटत आहे. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई हा महाराष्ट्राचाच भाग आहे, त्यामुळे मुंबईची भाषा मराठी याबाबत दुमत असल्याचे काहीही कारण नाही. भारताची एक विशेषत: आहे की येथे विविध भाषा बोलणारे लोक परस्परांना सोबत घेऊन चालतात. त्यांच्यात भाषेमुळे प्रश्न निर्माण होत नाही. म्हणूनच भारत देश हे जगासमोर आदर्श उदाहरण आहे.
मुंबईतही बहुभाषिक लोक आहेत आणि ते परस्परांवर स्नेहसंबंध ठेवूनच मुंबईचे जीवन चालत आहे. स्वाभाविकपणाने आमची सर्वांची अपेक्षा असते की बाहेरून येणाऱ्यांनी त्यांच्या भाषेसह मराठी भाषाही शिकावी, त्याचे अध्ययन करावे. मराठी भाषा ही सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध भाषा आहे. ती अनेकांनी अभ्यासावी असेच आम्हाला वाटते. माझ्या वक्तव्यावर जे राजकारण सुरु आहे त्यावर मी बोलू इच्छित नाही, तो माझा विषय नाही.





