रांजणगाव – येथील औद्योगिक वसाहतीमधील महाराष्ट्र एंव्हायरो पावर लिमिटेड या कंपनी विरोधात निमगाव भोगी ग्रामस्थांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेमध्ये संसद रत्न खासदार अमोल कोल्हे यांनी ज्या पद्धतीने आवाज उठवला तसाच आवाज विधानसभेतही उठवणार असल्याचे प्रतिपादन आमदार अशोक पवार यांनी केले. निमगाव भोगी व परिसरात या कंपनीच्या दूषित पाण्यामुळे जमीन मोठ्या प्रमाणात नापीक झाली आहे. माणसांचे व जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे, त्यामुळे निमगाव भोगी येथील ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या पार्श्वभूमीवर नुकतीच निमगाव भोगी येथे पंचक्रोशीतील ग्रामस्थांची एक बैठक झाली, व 20 सप्टेंबर रोजी रास्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अनुषंगाने शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी निमगाव भोगी गावातील ग्रामस्थांची भेट घेऊन कंपनीच्या प्रदूषित पाण्याने बाधित झालेल्या परिसराची पाहणी केली व ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचूदकर, शिरूर आंबेगाव काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत पाचंगे, वाल्मिक कुरुंदळे, निमगाव भोगीच्या सरपंच उज्वला अंकुश इचके, लक्ष्मण सांबारे, माजी सरपंच उत्तमराव व्यवहारे, उज्वला कौतिक इचके, विठ्ठलराव पवार, संतोष शिंदे, संजय देशमुख सागर नरवडे यांसह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.