पुणे कर थकवणाऱ्यांना पुन्हा ‘अभय’

पुणे –मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना राबवण्याला स्थायी समितीने मान्यता देण्यात आली आहे. एक कोटी रुपयांपर्यंत थकबाकी असणाऱ्या मिळकतींना ही सवलत असणार आहे. स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
ज्या मिळकतकरधारकांची मूळ मिळकतकर आणि 2 टक्के शास्ती अशी एकूण थकबाकी 1 डिसेंबर 2021 रोजी एक कोटी रुपयांपेक्षा कमी आहे, अशांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे. मोबाइल टॉवरच्या थकबाकीसाठी ही योजना लागू होणार नाही.
थकबाकीदाराला 20 डिसेंबर ते 26 जानेवारी 2022 या कालावधीत एक रकमी थकबाकी भरावी लागणार आहे. त्या थकबाकीदारांना शास्तीच्या रकमेत 75 टक्के सवलत देण्यात येणार आहे.
सद्यस्थितीत मिळकतकराची थकबाकी 7 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यामध्ये चक्रवाढ व्याजाने दोन टक्के शास्तीची रक्कम मूळ मागणीपेक्षा जास्त म्हणजेच चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मागील वर्षी 2 ऑक्टोबर ते 26 जानेवारी या कालावधीत अक्षय योजना पन्नास लाख रुपयांपर्यंत थकबाकी असणाऱ्यांसाठी अभय योजना राबवण्यात आली होती.
साडेतीन लाख जणांची थकबाकी
अद्याप थकबाकी असलेल्या मिळकतधारकांची संख्या 3 लाख 46 हजार आहे. त्यात एक रुपया ते एक कोटी रुपयांपर्यंतची मुद्दलातील थकबाकी 1270 कोटी रुपये आहे. एक कोटी रुपयापेक्षा जास्त थकबाकीदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मिळकतकर आणि थकबाकी वसूल करण्यासाठी नव्याने अभय योजना राबवण्यात येत असल्याचे रासने यांनी नमूद केले.





