PNB Scam : फरार आरोपी मेहूल चोक्सीच्या हस्तांतरणाचे विमानभर पुरावे

नवी दिल्ली – पंजाब नॅशनल बॅंकेत बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने 13 हजार 500 कोटी रूपयांचा घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी आणि व्यावसायिक मेहूल चोक्सीच्या हस्तांतरणासाठी भारतातून डोमानिकामध्ये पुरावे घेऊन एक खासगी विमान पाठवण्यात आले आहे, अशी माहिती अँटिग्वा आणि बार्बुडाचे पंतप्रधान ग्रॅस्टन ब्राऊनी यांनी दिली.
ब्राऊनी यांच्या या दाव्याला तात्काळ भारतीय प्रशासनाकडून कोणताही दुजोरा मिळू शकला नाही. डोमानिका येथील डग्लस चार्ल्स विमानतळावर कतार एअरवेजचे एक विमान दाखल झाले आहे, असे वृत्त अँटिग्वा न्यूज रुमने दिले आहे. त्यामुळे चोक्सीला हस्तांतरीत करणार असल्याची अफवा पसरली. ऍटिग्वामधून अत्यंत नाट्यमयरित्या बेपत्ता झाल्यानंतर तो डोमानिकात असल्याचे निष्पन्न झाले होते.
भारतातून आलेल्या या विमानातून चोक्सीच्या हस्तांतरणासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे आणण्यात आली आहेत, असे ब्राऊनी यांनी रेडिओला सांगितले. कतार एअरलाईन्सचे खासगी वापरासाठी उपलब्ध असणाऱ्या ए7सीईई या विमानाने शुक्रवारी पहाटे तीन वाजून 44 मिनिटांनी दिल्लीतून उड्डाण केले. ते डोमानिका येथे दुपारी एक वाजून 16 मिनिटांनी पोहोचले.
डोमानिकाच्या उच्च न्यायलयाने चोक्सीला त्यांच्या भूमीवरून हलवण्याच्या प्रक्रियेस स्थगिती दिली आहे. याबबात पुढील प्रक्रिया दोन जूनला होणार असून तो पर्यंत आहे ती स्थिती कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भारतीय आणि ऍटिग्वन पोलिसांसारख्या दिसणाऱ्या व्यक्तींनी आपले अपहरण करून आपल्याला डोमानिका आणल्याचा दावा चोक्सीने केला आहे. चोक्सीचे सुजलेले डोळे आणि हातातला झालेली जखम दर्शवणारी छायाचित्रे समाजमाध्यमांत व्हायरल झाली आहेत.




