पेट्रोल, डिझेल दरवाढीची ‘हॅट्ट्रिक’; अवघ्या 3 दिवसांत एवढे वाढले दर
Updated On:

नवी दिल्ली – सार्वजनिक इंधन कंपन्यांनी सलग तिसऱ्या दिवशी गुरूवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ केली. ती इंधने लिटरमागे अनुक्रमे 25 आणि 30 पैशांनी महागली. अवघ्या तीन दिवसांत मिळून दोन्ही इंधनांच्या दरांत प्रत्येकी 90 पैशांची वाढ झाली.
आता पेट्रोलचा दर दिल्लीत 87 रूपये 85 पैसे, तर मुंबईत 94 रूपये 36 पैसे इतका झाला आहे. दिल्लीत डिझेलचा दर 78 रूपये 03 पैसे, तर मुंबईत 84 रूपये 94 पैशांवर पोहचला आहे.
मागील वर्षीच्या मार्चपासून पेट्रोल 18 रूपये 26 पैशांनी, तर डिझेल 15 रूपये 74 पैशांनी महागले आहे. इंधन दर नवनवे उच्चांक करत असले तरी त्यावरील करांमध्ये कपात केली जाणार नसल्याचे सूतोवाच केंद्र सरकारने केले आहे. त्यामुळे इंधन दरवाढीच्या सत्रातून सर्वसामान्यांना तातडीने दिलासा मिळण्याची शक्यता नाही.





