इम्रान खान यांचे पंतप्रधानपद जाणार?

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत आज पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव मांडला जाणार होता. पण आज सभागृहात हा अविश्वास ठराव न मांडताच संसदेचे कामकाज तहकुब करण्यात आले. आता पुढील कामकाज 28 मार्च पासून सुरू होणार आहे.
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे खासदार खयाल जमान यांच्या निधनामुळे अधिवेशन 28 मार्च रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत तहकूब करण्यात येत असल्याची घोषणा नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष असद कैसर यांनी केली. त्यामुळे विरोधी नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
पाकिस्तानच्या संसदीय प्रथेनुसार एखाद्या खासदाराच्या मृत्यूनंतर त्या सदस्याला संसद सभागृहात श्रद्धांजली वाहिली जाते आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केली जाते. पण त्यानंतरचे कामकाज सुरळीत सुरू राहते. पण यावेळी मात्र सदस्याच्या मृत्यूचे कारण देत प्रथमच सभागृहाचे कामकाजच तीन दिवसांसाठी तहकुब केले गेले आहे. अधिवेशन तहकूब केल्याने विरोधकांनी गदारोळ केला. सरकारच्या विरोधातील अविश्वास ठरावावर आजच मतदान घेतले गेले पाहिजे अशी त्यांची मागणी होती.
इम्रान खान हे पाकिस्तानात आघाडी सरकार चालवत आहेत. तथापि त्यांच्या आघाडीतील काही पक्षांनी विरोधी पक्षांशी हातमिळवणी केली आहे त्यामुळे या सरकारवर अस्थिरतेची टांगती तलवार आहे. सरकारच्या विरोधात जो अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला आहे त्यात सरकारच्या बाजूने पुरेसे संख्याबळ नाही ही बाब स्पष्ट झाल्यानेच आज हे कामकाज तहकुब करून सरकारने पळ काढला आहे असा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे.
पाकिस्तानच्या राजकीय इतिहासानुसार कोणत्याही पाकिस्तानी पंतप्रधानाने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. दरम्यान आज अविश्वास ठरावाला सामोरे जाण्याऐवजी इम्रान खान सरकार संसद बरखास्तीची घोषणा करेल आणि देशात मध्यावधी निवडणुका घेईल असे मानले जात आहे. नियोजित कालावधीनुसार पाकिस्तानी संसदेची पुढील निवडणूक सन 2023 च्या अखेरीस होणार आहे.





