Nitin Nabin BJP: नितीन नबीन यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली, कार्यालयात भव्य स्वागत

Nitin Nabin BJP National Working President: भारतीय जनता पार्टी (BJP) पक्षाने बिहार सरकारमधील कॅबिनेट मंत्री नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. भाजपने घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. नबीन हे भविष्यात जे.पी. नड्डा यांच्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याची दाट शक्यता आहे.
अमित शाह आणि नड्डा यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला –
नवनियुक्त राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांनी सोमवारी (१५ डिसेंबर) पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयात औपचारिकपणे आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि पक्षाचे अन्य ज्येष्ठ नेते उपस्थित होते. पदभार स्वीकारण्यासाठी नबीन सोमवारी सायंकाळी बिहारहून दिल्लीतील पक्ष कार्यालयात दाखल झाले आणि तिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
पंतप्रधान मोदी आणि शाह यांच्याकडून अभिनंदन –
नबीन यांच्या नियुक्तीनंतर भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी नबीन यांना शुभेच्छा दिल्या. नबीन यांचा समृद्ध संघटनात्मक अनुभव आगामी काळात पक्षाला अधिक बळकट करेल, असा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला. नबीन यांची रविवारी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते ४५ वर्षांचे आहेत. ते लवकरच जे.पी. नड्डा यांच्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची शक्यता आहे.
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda व केंद्रीय गृहमंत्री श्री @AmitShah की उपस्थिति में नवनियुक्त राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष श्री नितिन नबीन ने आज नई दिल्ली स्थित पार्टी मुख्यालय में पदभार ग्रहण किया। pic.twitter.com/sgKg4Ng0Hw
— BJP (@BJP4India) December 15, 2025
विशेष म्हणजे, भाजपने राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी बिहारमधील एका नेत्याची निवड करून सर्वांना चकित केले आहे. बिहारमधून राष्ट्रीय अध्यक्ष होणारा हा पहिलाच नेता असेल. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोमवारी दुपारी नबीन पटनाहून दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. तिथे दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि भाजपच्या अन्य नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.
राजकीय प्रवास: २६ वर्षांचे तरुण आमदार ते राष्ट्रीय अध्यक्षपदाचे दावेदार
नितीन नबीन यांचा राजकीय प्रवास उल्लेखनीय आहे. वडिलांच्या, पक्षाचे दिग्गज नेते नवीन किशोर सिन्हा यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पटना पश्चिम विधानसभा मतदारसंघातून अवघ्या २६ वर्षांचे असताना त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले होते. तेव्हापासून बांकीपूर (पूर्वीचे पटना पश्चिम) मतदारसंघातून ते सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. सध्या ते बिहार सरकारमध्ये पथ निर्माण मंत्री म्हणून कार्यरत आहेत.
नेहमी अप्रत्याशित उमेदवारांना संधी देण्याची भाजपची परंपरा यावेळीही दिसून आली. या निवडीने अनेकांना आश्चर्यचकित केले. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा होण्यापूर्वी नबीन स्वतः विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये व्यस्त होते. “मी त्या सर्व पक्ष कार्यकर्त्यांसमोर नतमस्तक होतो, ज्यांच्या कठोर परिश्रमातून अनेक ‘नितीन नबीन’ तयार होतात,” असे विधान त्यांनी एका कार्यक्रमात केले होते.
भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा जन्म देखील बिहारमध्ये झाला होता, मात्र त्यांचे शिक्षण पाटणा येथे झाले आणि त्यानंतर ते त्यांच्या गृहराज्य हिमाचल प्रदेशात परतले. जे.पी. नड्डा यांची जानेवारी २०२० मध्ये भाजप अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती आणि त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी कार्यकाळात विस्तार देण्यात आला होता.





