Manoj Jarange Threat: कोणी दिली मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी? कथित ऑडिओ क्लिपमुळे खळबळ
Manoj Jarange Threat:

Manoj Jarange Threat: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना गोळ्या घालून मारण्याची धमकी देणारी एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या क्लिपमुळे बीड जिल्ह्यासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, धमकी देणाऱ्या व्यक्तीने संभाषणादरम्यान माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाचाही उल्लेख केल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, एका मद्यधुंद अवस्थेतील व्यक्तीने जरांगे समर्थकाला फोन करून ही धमकी दिली आहे. या संभाषणात तो व्यक्ती अत्यंत आक्रमक आणि अश्लील भाषेत बोलताना ऐकू येत आहे. “जरांगे पाटलांना कधी गोळ्या घालायचं ते सांग, मी स्वतः त्यांना गोळ्या घालतो” असे आव्हानच या व्यक्तीने संवादादरम्यान दिले आहे.
एवढेच नाही तर, “तुला फक्त जरांगेचा अभिमान आहे, तुला छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अभिमान नाही,” असे म्हणत त्याने संबंधित समर्थकावरही आगपाखड केली.
धनंजय मुंडेंच्या नावाचा उल्लेख –
संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये या व्यक्तीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या नावाचाही संदर्भ दिला आहे. मात्र, तो संदर्भ नेमका कोणत्या कारणाने आणि कोणत्या उद्देशाने देण्यात आला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या प्रकरणाची व्याप्ती वाढल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांची भूमिका आणि अद्याप गूढ कायम –
ही ऑडिओ क्लिप नेमकी कुठली आहे आणि त्यातील व्यक्ती कोण आहे, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडे अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. दरम्यान, या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेची पुष्टी झालेली नाही.





