देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याच्या इच्छेवर दिल्लीत हालचाली

मुंबई, – लोकसभा निवडणुकीत महायुतीला जबर फटका बसल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत थेट राजीनामा देण्याचे संकेत दिले. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आता घडामोडींना वेग आला आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर आता दिल्लीतही याबाबत हालचाली सुरू आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन केल्याची चर्चा आहे. त्यातच गुरूवारी फडणवीस दिल्लीलाही जाणार असल्याची माहिती आहे.
राज्यात भाजपला फक्त 9 जागा मिळाल्या. यानंतर विरोधकांकडून सातत्याने फडणवीस यांना लक्ष करत ते पराभवाचे कारण असल्याची टीका केली जात होती. फडणवीसांनी त्यानंतर पत्रकार परिषदेत पराभवाची जबाबदारी स्वीकारली. यावेळी, ”संविधान बदल, मराठा आरक्षणाबाबत झालेल्या अपप्रचाराला उत्तर देण्यास आम्ही कमी पडलो, म्हणून आमचे नुकसान झाले. त्याची जबाबदारी मी घेतो. पण विधानसभेला आम्ही पुन्हा पूर्ण ताकदीने जनतेत जाऊ. त्यासाठी मी पक्षनेतृत्वाला विनंती करीन की पक्षसंघटनेत पूर्णवेळ काम करण्यासाठी मला सरकारमधून मोकळे करावे” असे फडणवीस म्हणाले होते.
त्यानंतर आता गुरूवारी ते दिल्लीत जाणार असून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेणार आहेत. मात्र त्यापूर्वीच गुरुवारी सकाळी अमित शहा यांनी स्वत: फडणवीस यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली. फडणवीस यांची भूमिका शहांनी जाणून घेतल्याचे बोलले जात आहे. तसेच या मुद्यावर दिल्लीत आल्यावर, प्रत्यक्ष भेटीत चर्चा करू, असे शहांनी फडणवीसांना सांगितल्याची चर्चा आहे.
दिल्लीत भाजपची संसदीय पक्षाची बैठक
त्यातच उद्या दिल्लीत भाजपची संसदीय पक्षाची बैठक आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार आहेत. या बैठकीत अमित शहा हे देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करतील. खरे तर राज्यातील प्रत्येक भाजप कार्यकर्त्याला, नेत्यांना फडणवीस यांचे नेतृत्व पाहिजे आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या भूमिकेबाबत सविस्तर चर्चा होणार आहे.





