कानिफनाथ महाराज की जय….! मढीत उसळला जनसागर; आठ लाख भाविकांकडून कानिफनाथांचे दर्शन

पाथर्डी – कानिफनाथ महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणांच्या जयकारात व डफ, ताशांच्या ठेक्यांमध्ये राज्यासह गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील मिळून सुमारे आठ लाख भाविकांनी मढी येथे चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. रंगपंचमी हा नाथांचा समाधी दिन असल्याने आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांचा जनसागर उसळला. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा यात्रा दीडपट अधिक झाल्याचा अंदाज ग्रामपंचायत व देवस्थान समितीने व्यक्त केला.
पुणे, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, कल्याण, नाशिक या भागातील भाविकांची सर्वाधिक संख्या होती. मढीपासून सुमारे पाच किलोमीटर वर्तुळामध्ये सर्वत्र वाहतूक कोंडी , देवकाठ्यांची गर्दी व भाविकांचा गडाकडे जाण्यासाठीचा मार्ग फुलून गेला होता. गडाकडे येण्यासाठी मायंबा, घाटशिरस, तिसगाव, निवडुंगे व पाथर्डी येथून रस्ते आहेत. भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता बंदोबस्तावरील पोलिसांनी एकेरी वाहतूक सुरू करून कोंडी कमी करण्याचा प्रयत्न केला. तरीही नगर ते पाथर्डी व पाथर्डी ते पैठण असा रस्ता पूर्णपणे वाहतुकीच्या कोंडीत हरवून गेला होता. पाथर्डी शहरात तर वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस अत्यंत कमी पडले. काही व्यावसायिकांनीच वाहतूक पोलिसांचे काम करत कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला.
राज्य परिवहन मंडळाच्या नगर विभागातील व नाशिक प्रादेशिक विभागातील मिळून 250 बसगाड्या विविध भागातून यात्रेकरूंच्या सोयीसाठी तैनात होत्या. प्रचंड पोलीस बंदोबस्त असूनही मढीच्या यात्रेत नेहमीप्रमाणे मोबाईल चोरी, साखळी चोर व पाकीटमारी मोठ्या प्रमाणावर झाली. राज्याच्या विविध भागातून 65 हजारांहून अधिक देवकाठ्या काल दुपारपासून मंदिराच्या कळसाला लागल्या, असे ग्रामविकास अधिकारी गणेश ढाकणे यांनी सांगितले.
सर्वाधिक आर्थिक उलाढाल हलवाई व्यवसायात झाली. यंदा श्रीरामपूर तालुक्यातील रेवडी, गोडी शेव विक्रेत्यांची उपस्थिती भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. भाविकांची संख्या वाढल्याने रेवडी व्यवसायातही मोठी उलाढाल झाली. सर्व विक्रेत्यांनी मिळून 500 टनाहून अधिक रेवड्या उत्पादित केल्या आहेत. येत्या आठ दिवसांत या रेवड्या विकतील, असा विश्वास प्रमुख रेवडी विक्रेते बाळासाहेब भोसले यांनी व्यक्त केला.
श्रीरामपूरच्या पट्ट्यातून जास्त माल आल्याने यंदा भाव वाढ झाली नाही. 140 ते 160 रुपये किलो या दराने प्रसादासाठी रेवडी विकली गेली. चपट्या रेवड्या प्रसाद म्हणून वाटण्यासाठी तर गोल रेवड्या देवाचे दर्शन घेताना कळसाला प्रसाद अर्पण करत कळसाच्या दिशेने भिरकावल्या जातात. नाथ पूजा साहित्य, शेतीसाठी लागणारी लोखंडी अवजारे, स्वयंपाक घरात लागणारी सर्व प्रकारच्या लाकडी वस्तू याचीही मोठ्या प्रमाणावर विक्री झाली.
उन्हाची तीव्रता अधिक असल्याने पिण्याच्या पाण्याला मागणी जास्त होती. सर्व व्यापाऱ्यांनी मिळून सुमारे 2000 बॉक्स पाणी विकले तर ग्रामपंचायतीचे स्टॅन्ड पोस्ट ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी अहोरात्र सुरू होते. देवस्थान समितीने यंदा दर्शन व्यवस्था अत्यंत व्यवस्थित केली. त्यामुळे दर्शनाचा वेग वाढला. दोन्ही बाजूंनी भाविकांना बाहेर जाण्यासाठी रस्ता असल्याने गाभाऱ्यामध्ये गर्दी झाली नाही.
राजस्थानी समाज कानिफनाथांना रामदेवबाबांचे रूप मानतो. त्यामुळे त्यांना चुरमा व डाळ बाटी महाप्रसाद वाटप केला. पुण्याच्या मावळ भागातील विविध मंडळांनी दीडशे ते 200 ताशांचे पथक वाजवत देवकाट्यांची मिरवणूक काढली. यंदा यात्रेसाठी जागा अधिक वाढल्याने सुमारे साडेतीनशे नवीन मंडप स्थापले जाऊन यात्रा आणखी वाढली. पुढील वर्षी राज्यातील सर्वाधिक मोठी यात्रा म्हणून मढी देवस्थानच्या यात्रेकडे बघितले जाईल, असा विश्वास सरपंच संजय मरकड यांनी व्यक्त केला.
पनवेल भागातील बहुसंख्य भाविक समान वेशभूषेत आल्याने ठिकठिकाणी यात्रेमध्ये भगव्या रंगाचे भाविक दिसून यात्रेला एक प्रकारे भगवी किनार शोभून दिसत होती. धार्मिक प्रथा व परंपरा न पाळणाऱ्या व्यावसायिकांना यात्रेत बंदी घातल्याचा परिणाम म्हणून विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा यात्रेमध्ये यंदा आवर्जून हजेरी लावत या निर्णयाचा फायदा मोठ्या प्रमाणावर झाल्याचे निष्कर्ष काढले. यात्रेचा पंधरा दिवसांपैकी सर्वाधिक मोठा टप्पा हा रंगपंचमीचा असतो. आज भाविकांच्या गर्दीपुढे व वाहनांच्या विशिष्ट चालवण्याने सर्वत्र किरकोळ अपघाताच्या प्रमाणात वाढ होऊन सर्वसाधारणपणे 40 ते 50 अपघात आज तालुक्यामध्ये झाले. मात्र पोलिसांकडे त्याची नोंद नाही.
मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार, कोषाध्यक्ष बबन मरकड, सचिव विमल मरकड, सचिन गवारे, शिवाजी डोके, रवींद्र आरोळे, भाऊसाहेब मरकड या विश्वस्तांनी विविध मान्यवरांचे स्वागत करत व्यवस्थेवर देखरेख ठेवली. यंदा चतुर्थी व पंचमी अशी मिळून भव्य यात्रा झाल्याने भाविकांना सुलभपणे दर्शन मिळाले.
सायंकाळी पाचनंतर परिसरातील भाविकांची गर्दी वाढल्याने सर्वत्र वाहतूक कोंडी प्रचंड प्रमाणात झाली. अनेक वर्षांनंतर लोकनाट्य मंडळे व ऑर्केस्ट्रा यात्रेत आल्याने तमाशा रसिकांसह सर्वच रसिक यात्रेकरूंनी लाभ घेतला. सायंकाळी पाचनंतर मढी परिसराकडे येणारी सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले. यात्रेचा तिसरा टप्पा फाल्गुन अमावस्या म्हणजे 29 मार्चला होऊन गुढीपाडव्याला महापूजेने यात्राची सांगता होईल.
दोनशे टन गोडीशेव संपली, रेवडी वधारली
हलवाई व्यवसायिकांक ग्राहकांना देण्यासाठी सायंकाळी साडेसात वाजता गोडी शेव शिल्लक राहिली नाही. एका दिवसांत आज दोनशे टनहून अधिक माल पूर्णपणे संपला. बेलापुरी गोडी शेव, पाथर्डीची गोडीशेव, काही विक्रेत्यांनी नगरवरून आणलेली गोडी शेव, अशी सर्व गोडी शेव संध्याकाळी संपली. संध्याकाळी रेवडी बाजारामध्ये रेवड्यांचे दर वाढले. 160 रुपये किलो विकली गेलेली रेवडी दोनशे रुपये किलो सहजपण विकत होती. रंगपंचमीच्या यात्रेचे गेल्या 100 वर्षातले सर्व विक्रम आज मागे पडले.

