‘एनडीए’चा निसटता विजय! भाजपचं संख्याबळ घटलं; मित्रपक्षांनी तारलं

नवी दिल्ली – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने सर्वांनाच चकवले. शब्दश: निसटता विजय मिळाल्याने भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी (एनडीए) केंद्राची सत्ता कशीबशी राखू शकली. एनडीएला विरोधकांच्या इंडिया आघाडीने अतिशय कडवी फाईट दिली. त्यामुळे ४०० पार चा नारा देणाऱ्या भाजप आणि एनडीएची बहुमताचा २७२ हा आकडा ओलांडताना दमछाक झाली.
एकूण ५४३ संख्याबळ असलेल्या लोकसभेच्या जागांच्या संख्येचा विचार करता उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि बिहार ही राज्ये अनुक्रमे पहिल्या ४ क्रमांकांवर आहेत. मात्र, त्या चारही राज्यांत यावेळी भाजपचे मोठे राजकीय नुकसान झाले. हिंदी भाषिक पट्ट्यातील राज्ये भाजपची बलस्थाने मानली जातात. मात्र, त्या पट्ट्यातील उत्तरप्रदेशसह राजस्थान आणि हरियाणा या ३ राज्यांत त्या पक्षाला पीछेहाटीला सामोरे जावे लागले.
त्यामुळे मागील २ निवडणुकांत वैयक्तिकरित्या बहुमताचा आकडा पार करणाऱ्या भाजपला यावेळी ती किमया साधता आली नाही. तसे असले तरी, एनडीएमधील इतर घटक पक्षांमुळे ती आघाडी बहुमताचा आकडा ओलांडू शकली. त्यातून भाजपचं संख्याबळ घटलं तरी मित्रपक्षांनी तारल्याचं चित्र पुढे आले. निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएला बहुमत मिळाल्याकडे लक्ष वेधत सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापण्याचे सूतोवाच केले.
आता संख्याबळ घटलेल्या एनडीएमध्ये आणि नव्या सरकारमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूचे, आंध्र प्रदेशचे नियोजित मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीचे महत्व वाढणार आहे. केंद्रातील सत्तेत एनडीएची हॅट्ट्रिक होणार असली तरी विरोधकांची ताकद आता वाढली आहे. एकीकडे एनडीएचे संख्याबळ घटले असताना दुसरीकडे कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचा समावेश असणाऱ्या इंडिया आघाडीचे बळ लक्षणीयरित्या वाढले आहे. मात्र, यावेळी सत्ता मिळवण्याचे इंडियाचे स्वप्न भंगले आहे.





