Bihar Elections 2025: ‘एनडीए’ला मतदानापूर्वीच मोठा झटका; ‘ग्लॅमर क्वीन’ सीमा सिंह यांचे आमदार होण्याचे स्वप्न भंगले

Bihar Assembly Elections 2025: बिहार विधानसभा निवडणुकीला सुरुवात होण्यापूर्वीच राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ला मोठा धक्का बसला आहे. मतदानाच्या आधीच एनडीएने सारण जिल्ह्यातील मढौरा विधानसभा मतदारसंघातील जागा गमावली आहे.
ही जागा NDA मधील चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती (रामविलास) पार्टीच्या वाट्याला आली होती. पक्षाने ‘ग्लॅमर क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीमा सिंह यांना येथून उमेदवारी दिली होती. मात्र, सीमा सिंह यांना आपले नामांकन पत्र योग्यरित्या भरता न आल्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला आहे.
सारणमधील मढौरा मतदारसंघात लोजपा (रामविलास) च्या सीमा सिंह यांच्यासह एकूण चार उमेदवारांचे नामांकन अर्ज छाननीमध्ये अवैध ठरले आहेत. अर्ज बाद झालेल्यांमध्ये जदयूचे (JDU) माजी जिल्हाध्यक्ष अल्ताफ राजू (अपक्ष म्हणून अर्ज), बसपाचे (BSP) आदित्य कुमार आणि अपक्ष विशाल कुमार यांचा समावेश आहे. छाननीनंतर आता या जागेवर एकूण नऊ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत.
मढौरामध्ये आता आरजेडी आणि जन सुराजमध्ये थेट लढत –
सीमा सिंह यांचा अर्ज रद्द झाल्यामुळे आता मढौरा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) जितेंद्र राय आणि जन सुराज पक्षाचे अभय सिंह यांच्यात थेट लढत होणार आहे. जितेंद्र राय हे २०१० पासून येथील विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे मतदानापूर्वीच सीमा सिंह यांच्या ‘सेल्फ गोल’मुळे आरजेडीचा मार्ग सुकर झाला आहे, असे म्हटले जात आहे.
मढौरा मतदारसंघातील अंतिम नऊ उमेदवार (१) लालू प्रसाद यादव – राष्ट्रीय जनसंभावना पार्टी (२) सनदेव कुमार राय – अपक्ष (३) जितेंद्र कुमार राय – राष्ट्रीय जनता दल (४) अंकित कुमार – अपक्ष (५) मनेजर कुमार – अपक्ष (६) नवीन कुमार सिंह उर्फ अभय सिंह – जन सुराज पार्टी (७) अभिषेक रंजन – अपक्ष (८) मधुबाला गिरी – द प्लुरल्स पार्टी (९) पुरुषोत्तम कुमार – राष्ट्रीय सब जनशक्ती पार्टी.




