पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे पडणार; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Chandrakant Khaire On Pankaja Munde and Raosaheb Danve – लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात उद्या 57 जागांवर मतदान होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत. त्याआधी कोण जिंकणार ? कोण हरणार? याबाबत अनेक नेतेमंडळींकडून दावे केले जात आहेत. अशातच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे या निवडणूकीत पराभूत होणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मीडियाशी संवाद साधताना खैरे यांनी हा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यावर आश्चर्यही व्यक्त केलं जात आहे.
काय म्हणाले चंद्रकांत खैरे ?
महाविकास आघाडीला राज्यात 32 जागा मिळतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपले आहेत. मराठवाड्यात महायुतीला एकही जागा मिळणार नाही. रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे पडणार आहेत. परमेश्वर रावसाहेब दानवे यांचा बदला घेणार आहे, असा दावा खैरे यांनी केला आहे. तसेच निवडणूक निकाल म्हटल्यावर धाकधूक होतेच. शाळेत असताना परीक्षेच्यावेळीही धाकधूक व्हायची. पेपर सोपा गेला की बरं वाटायचं. आताही पेपर सोपा गेला आहे. पण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहून चालणार नाही. कारण शेवटी मतदारांच्या हातात कौल आहे, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.
संदीपान भुमरेंच्या दाव्यावर टीका –
संदीपान भुमरे यांनी दावा केला आहे की, मी एक ते दीड लाखांचं मताधिक्य घेऊन विजयी होणार आहे. भुमरे यांच्या या दाव्यावरही खैरे यांनी टीका केली. खैरे म्हणाले, भुमरेंनी ईव्हीएम मशीन बदल्या आहेत का? एक लाखाचं मताधिक्य घेऊन निवडून येणं कसं शक्य आहे? असा सवाल त्यांनी केला. तर यावेळी हिंदू मते तर मिळणारच आहे. पण 22 टक्के मुस्लिम मतेही मला मिळणार आहे, असा दावा त्यांनी केला.
एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्याबाबत बोलताना खैरे म्हणाले. जलील यावेळी निवडणूक येणार नाहीत. मुस्लिम समाज आमच्याकडे आला आहे. त्यामुळे जलील यांचं मतदान घटलं आहे. वंचित बहुजन आघाडी त्यांच्यासोबत नव्हती. त्यामुळे वंचितचा फटका जलील यांना बसणार आहे. ते निवडून येणं शक्य नाही.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरात यंदा तिरंगी लढत आहे. एमआयएमचे इम्तियाज जलील, मुख्यमंत्री शिंदे गटाचे संदिपान भुमरे, आणि उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांच्यात लढत आहे. प्रत्येकजण आपणच मोठ्या मताधिक्क्याने निवडूण येणार असल्याचा दावा करत आहेत. मात्र आता 4 जून रोजीच सर्वकाही स्पष्ट होणार आहे.




