नवी दिल्ली – कारागृहात असणारे राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची रांची येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना प्रकृती आणखी खालावल्याने त्यांना उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवण्यात आले.
चारा घोटाळ्यात कारागृहात असणारे प्रसाद (72) यांच्यावर राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (रिम्स)येथे उपचार सुरू होते. त्यांना विविध आजारांनी सध्या ग्रासले आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास होत आहे. त्यांना न्युमोनिया झाल्याचे शुक्रवारी निष्पन्न झाले. त्यांच्या अधिक चांगले उपचार होण्यासाठी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला, असे रिम्सचे संचालक डॉ. कामेश्वर प्रसाद यांनी सांगितले.
आठ वैद्यकीय तज्ज्ञांची समितीने लालू यांची तपासणी करून आपला अहवाल सादर केला. कारागृह प्रशासनाने त्यांना दिल्लीला हलवण्यासाठी सीबीआय न्यायलयाची विशेष परवानगी घेतली. लालूप्रसाद यांची प्रकृती खालावल्याचे समजताच त्यांची पत्नी राबडी देवी, कन्या मिसा भारती आणि मुलगा तेजप्रताप यांनी रांचीला विशेष विमानाने शुक्रवारी धाव घेतली होती. रात्री त्यांनी लालू यांची भेट घेऊन विचारपूस केली.
त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वडिलांना भेटल्यानंतर तेजस्वी यांनी पत्रकारांना सांगितले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची भेट घेऊन लालूप्रसाद यांना दिल्लीला घेऊन जाण्यासाठी राज्य सरकारने आवश्यक ती मदत करावी, अशी विनंती केली.
झारखंड उच्च न्यायालयाने लालू प्रसाद यांना रिम्समध्ये दाखल करताना कारागृह संहितेचे उल्लंघन केल्याच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. त्याची पुढील सुनावणी पाच फेब्रुवारीला होणार आहे.