Kolkata rape-murder case: ‘पॉलिग्राफ टेस्ट’नंतर आणखीनच गोंधळ वाढला

कोलकाता – कोलकाता येथील आर जी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयातील महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि तिची हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याची सीबीआयने रविवारी पॉलिग्राफ टेस्ट केली. त्याच्यासोबतच वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि अन्य सहा जणांचीही पॉलिग्राफ टेस्ट करण्यात आली.
केंद्रीय अन्वेषण विभागाला या टेस्टमधून काय हाती लागले याची आता चर्चा सुरू आहे. संजय रॉयची पॉलिग्राफ टेस्टसोबतच लाय डिटेक्टर टेस्टही करण्यात आली असून त्यात त्याने असा खळबळजनक दावा केला आहे की तो घटनास्थळी पोहोचला तेंव्हा महिला डॉक्टरचा अगोदरच मृत्यू झाला होता.
रॉयची पॉलिग्राफ टेस्ट तुरूंगातच करण्यात आली. त्याने सीबीआयच्या अनेक प्रश्नांची चुकीची उत्तरे दिली अशी शंका व्यक्त केली जाते आहे. एका प्रख्यात इंग्रजी माध्यमाने दिलेल्या बातमीनुसार टेस्ट करण्यात आली त्या पूर्ण काळात संजय रॉय प्रचंड अस्वस्थ दिसत होता. घटनेशी संबंधित पुराव्यांच्या आधारे सीबीआयने त्याला अनेक प्रश्न विचारले मात्र त्याने कारणे सांगायचाच प्रयत्न केला.
त्याने असाही दावा केला की तो ज्यावेळी घटनास्थळी पोहोचला त्यावेळी डॉक्टर महिलेचा अगोदरच मृत्यू झाला होता. तिला मृतावस्थेत पाहिल्यानंतर आपण घाबरलो व त्यामुळे रूग्णालयातूनच पळ काढल्याचे त्याने म्हटले आहे. आपण निर्दोष असून आपल्याला यात गोवले जात असल्याचा दावा त्याने पॉलिग्राफ टेस्टच्या अगोदरही केला होता.
तथापि, संजय रॉयला जेंव्हा अटक करण्यात आली होती त्यावेळी त्याने पोलिसांना वेगवेगळे जबाब दिले आहेत. या बलात्कार आणि हत्येबाबत आपल्याला माहितीच नाही असे तो म्हणाला होता आणि मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांसमोरही त्याने असाच जबाब दिला होता.
सीबीआयच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार संजय रॉय प्रत्येक वेळी नवीन काहीतरी माहिती देतो आहे. त्यामागे तपासाची दिशा बदलण्याचा त्याचा डाव वा प्रयत्न असू शकतो. मात्र त्याच्या चेहऱ्यावर जखम कशी झाली आणि रूग्णालयात हा भयंकर गुन्हा घडला त्यावेळी तो तेथे कशासाठी आला होता या मुख्य प्रश्नांची त्याने अद्याप उत्तरे दिलीच नाहीत.





