Israeli–Palestinian conflict : इस्रायलने केलेल्या प्रतिहल्ल्यात पॅलेस्टाईनचे 198 लोक ठार

जेरुसलेम – हमासच्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरासाठी इस्रायलने केलेल्या प्रतिहल्ल्यामध्ये पॅलेस्टाईनमधील 198 जण ठार झाले आहेत. तर तब्बल 1,610 जण जखमी झाले आहेत, असे गाझामधील पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
इस्रायलने गाझामध्ये अनेक हवाई हल्ले केले आहेत आणि किनारपट्टीच्या सीमेवरील कुंपणावरील सुरक्षा रक्षकांवर जोरदार गोळीबार केला आहे. या जीवितहानीबद्दल पॅलेस्टाईनकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
मात्र गाझामधील वृत्तसंस्थांनी यासंबंधीचे वृत्त दिले आहे. रुग्णालयांमध्ये जखमी नागरिकांना आणले जाऊ लागले आहे दफनभूमीमध्ये अनेक मृतदेह आणले गेल्याचे स्थानिक सूत्रांनी म्हटले आहे.
इस्रायलच्यावतीने गाझा पट्ट्यातून डागलेले तब्बल 2,500 रॉकेट पाडण्यात आले. या रॉकेट हल्ल्यामुळे तेल अविव आणि जेरुसलेम या शहरांमध्ये सकाळपासून सातत्याने धोक्याचे भोंगे वाजवले जात होते.
हमासने एक गंभीर चूक केली आहे आणि इस्रायल हे युद्ध जिंकेल, असा ठाम विश्वास इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी एका टिव्हीवर केलेल्या भाषणात व्यक्त केला आहे.


