हरियाणात कॉंग्रेस सत्तेत आल्यास कोण होणार मुख्यमंत्री? हुडा पिता-पुत्र शर्यतीत

चंदिगढ – विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जात असणाऱ्या हरियाणातील कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदाची शर्यत रंगली आहे. विशेष बाब म्हणजे, पिता-पुत्रांची नावे त्या शर्यतीत नोंदली गेली आहेत. माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुडा आणि खासदार दिपेंदर हुडा हे ते पिता-पुत्र आहेत.
हरियाणाची सत्ता हस्तगत करण्यासाठी यावेळी पोषक स्थिती असल्याचा विश्वास कॉंग्रेसला वाटत आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असणाऱ्या त्या पक्षातील नेत्यांच्या आकांक्षा जागृत झाल्या आहेत. कॉंग्रेसच्या सर्वांत प्रभावी नेत्यांमध्ये ७७ वर्षीय भुपिंदर हुडा यांचा समावेश आहे. साहजिकच, कॉंग्रेसचा विजय झाल्यास ते मुख्यमंत्रिपदासाठी सर्वांत प्रबळ दावेदार मानले जातात. मात्र, त्यांच्या मार्गात वय हा घटक मोठा अडसर ठरू शकतो, अशी कुजबूज सुरू आहे. त्यातून हुडा परिवाराचा प्रभाव पाहता ४६ वर्षीय दिपेंदर यांचेही नाव पुढे आले आहे. दिपेंदर कॉंग्रेसच्या प्रचार मोहिमेतील महत्वाचा चेहरा ठरले आहेत.
अर्थात, स्वत: भुपिंदर हुडा तूर्त तरी स्वत:चे नाव प्रोेजेक्ट करताना दिसत आहेत. पत्रकारांनी पुत्रही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याविषयीचा प्रश्न विचारल्यावर ते मिश्कीलपणे उत्तर देतात. मला रिटायर करण्याची तुमची इच्छा का आहे? मी थकलेलो (टायर्ड) नाही किंवा निवृत्तही (रिटायर्ड) झालेलो नाही, असे ते म्हणतात.
त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आपले नाव कायम राहील याची दक्षता भुपिंदर हुडा घेत असल्याचे दिसून येते. तसे असले तरी, मुख्यमंत्री पदाविषयीचा अंतिम निर्णय कॉंग्रेस श्रेष्ठी घेतील. तो मला मान्य असेल, असे म्हणत ते इतरांना संधी मिळाली तर आकांक्षा गुंडाळण्यास तयार असल्याचे सूचित करत आहेत. त्यातून ते पुत्राचेही नाव चर्चेत राहील यादृष्टीने राजकीय चाणाक्षपणा दाखवत असल्याचेही स्पष्ट होत आहे.





