नेवासा: शनीच्या झोळीत हात घालणाऱ्यांना सोडणार नाही – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

नेवासा : “संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन भूमीत अध्यात्माचे कार्य सुरू असताना, अधर्माचे काम करणाऱ्यांना शनीचा कोप कसा असतो, हे सांगण्याची गरज नाही. ज्यांनी शनीच्या झोळीत हात घातला, त्यांना सोडणार नाही,” असा सज्जड इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.
नेवासा शहरातील नगरपंचायतीच्या नवीन अग्निशमन बंब, नेवासा पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन, दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण आणि नेवासा फाटा येथील डॉ. लोखंडे पाटील यांच्या प्रायमस मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नेफ्रोलाईफ डायलिसिस सेंटरचे उद्घाटन शुक्रवारी (दि. ८ ऑगस्ट २०२५) सकाळी १० वाजता विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
या प्रसंगी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग, पंचगंगा उद्योग समूहाचे संस्थापक प्रभाकर (काका) शिंदे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, माजी सभापती रावसाहेब कांगुणे, भाजपाचे युवा नेते ऋषीकेश शेटे, किसनराव गडाख पेशवे, उपजिल्हाध्यक्ष सचिन देसर्डा, बाळासाहेब पवार, नेत्या अमृता नळकांडे, ज्ञानेश्वर पेचे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रायमस मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नेफ्रोलाईफ डायलिसिस सेंटरचे उद्घाटन झाले. यावेळी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हॉस्पिटलचे संचालक डॉ. निलेश लोखंडे आणि सौ. रेश्मा लोखंडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
विखे पाटील यांनी यावेळी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या पाठबळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने कोणतीही योजना बंद केलेली नाही. सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा दीड लाखांवरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रायमस हॉस्पिटलमध्ये सुरू झालेल्या डायलिसिस सेंटरमुळे गोरगरीब रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे.
यावेळी सुनिलराव लंघे, अरुणराव देशमुख, बबनराव गायकवाड, डॉ. अशोक झरेकर, डॉ. बाळासाहेब कोलते, भाऊसाहेब अंबाडे, मेडिकल असोसिएशनचे रमेश सावंत, राम केंदळे, दादा निपुंगे, दिलीपराव सरोदे, एन. एस. काळे, भारत गुंजाळ, डी. एम. वाघ, योगेश म्हस्के, प्रकाश सोनटक्के, सुरेश उभेदळ, ज्ञानेश्वरचे संचालक काकासाहेब शिंदे, नामदेवराव नवले, संभाजी दहातोंडे, प्रभाकर म्हसे, मंडलाधिकारी सरिता मुंढे, हभप जगताप, बच्चू बोरकर, गणेश चौगुले, शहाजी गडेकर यांच्यासह सामाजिक-राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
“आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांना शनीदेव प्रसन्न आहेत, पण जर शनी कोपला तर काय होईल, सांगता येत नाही,” अशी कोपरखळी मारत विखे पाटील यांनी शनीच्या झोळीत हात घालणाऱ्यांना सोडणार नसल्याचा इशारा दिला. यावेळी नेवासा शहरात ७ कोटी ४२ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.





