Government Bank Strike: पाच दिवसांचा आठवडा करा; मागणीसाठी सरकारी बॅंकेचे कर्मचारी जाणार संपावर
जर कर्मचार्यांनी खरोखरच 27 जानेवारी रोजी संप केला तर बँकांच्या कामकाजावर सलग तीन दिवस परिणाम होणार आहे.

Government Bank Strike: कामकाजाचा आठवडा पाच दिवसाचा करावा आणि इतर मागण्यासाठी सरकारी बँक कर्मचार्यांच्या संघटनेने 27 जानेवारी रोजी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. जर कर्मचार्यांनी खरोखरच 27 जानेवारी रोजी संप केला तर बँकांच्या कामकाजावर सलग तीन दिवस परिणाम होणार आहे.
कारण 25 आणि 26 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांनी आपल्या ग्राहकांना या संदर्भात माहिती दिली आहे. बँक कर्मचार्यांच्या संघटनांनी बुधवारी आणि गुरुवारी मुख्य कामगार आयुक्ताबरोबर यासंदर्भात चर्चा केली आहे.
सध्या बँक कर्मचार्यांना दुसर्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी
यावेळी अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तपशिलात चर्चा होऊनही यासंदर्भात तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे आम्ही संप करण्याचा निर्णय घेतला आहे, असे कामगार संघटनांनी सांगितले आहे. सध्या बँक कर्मचार्यांना दुसर्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. त्याचबरोबर रविवारी सुट्टी असते.
मात्र सर्व शनिवारी सुट्टी असावी असे बँक कर्मचार्यांनी म्हटले आहे. मार्च 2024 मध्ये वेतन करारावेळी आमच्या या मागणीला बँकांच्या वरिष्ठ व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र त्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे आम्हाला हा संप करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.
बँक कर्मचार्यांच्या संघटनेने म्हटले आहे की, रिझर्व बँक, एलआयसी, जीआयसी, शेअर बाजार आणि इतर काही सरकारी कार्यालयात पाच दिवसाचा आठवडा असतो. त्यामुळे बँक कर्मचार्यांना पाच दिवसाचा आठवडा असावा. हा संप सरकारी बँकातील कर्मचार्यांचा आहे. त्यामुळे खासगी क्षेत्रातील बँकांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता नाही.




