सांगली – लावणी क्विन म्हणून ओळखली जाणाऱ्या गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तिच्या कार्यक्रमांवर महाराष्ट्रात बंदी घालावी अशा मागणीचे निवेदन सांगली पोलिसांना देण्यात आले आहे. राष्ट्र विकास सेनेच्या वतीने युवक प्रदेशाध्यक्ष प्रशांत सदामते यांनी हे निवेदन पोलिसांना दिले आहे.
निवेदनात म्हंटलेय की, महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि लावणी संस्कृतीला गौतमी पाटील ही छेद देण्याचे काम करत आहे. तिच्या लावणी कार्यक्रमात तिच्याकडून होणारे अश्लील हावभाव, हातवारे, इशारे यामुळे प्रचंड प्रमाणात त्या लावणी कार्यक्रमाला गर्दी होत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहे. काही दिवसांपूर्वी बीड या ठिकाणी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमामध्ये असा प्रकार घडला होता. त्याचबरोबर मिरजेच्या बेडग या ठिकाणी देखील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळाचा प्रकार घडला होता. त्यामुळे गौतमी पाटील हिच्या महाराष्ट्रातील लावणी कार्यक्रमांवर बंदी आणावी, अशी मागणी राष्ट्र विकास सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. युवक प्रदेशाध्यक्ष प्रशांत सदामते यांच्या नेतृत्वाखाली सांगलीचे पोलीस अधीक्षकांकडे याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.
त्याचबरोबर मिरजेच्या बेडग या ठिकाणी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या मृत्यू प्रकरणी गौतमी पाटील हिच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील सदामते यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
काही महिन्यांपूर्वी मिरजेच्या बेडग या ठिकाणी गौतमी पाटीलचा लावणीचा कार्यक्रम झाला होता. या ठिकाणी या कार्यक्रमाच्या वेळी दत्तात्रेय ओमासे या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मात्र, मिरज पोलिसांनी हा मृत्यू आकस्मिक असल्याचे नोंद केली आहे. मात्र, हा मृत्यू लावणी कार्यक्रमामुळे झाल्याचा आरोप राष्ट्र विकास सेनेच्या वतीने करण्यात आलेला आहे. यामुळे या मृत्यूची चौकशी करून गौतमी पाटील हिच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील राष्ट्र विकास सेनेच्या वतीने प्रशांत सदामते यांनी केली आहे. त्यामुळे आता गौतमी पाटीलच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गौतमी पाटील हि खानदेश म्हणजे धुळे मधील शिंदखेडा या गावची आहे. गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण गौतमीच्या लावणीचे दिवाने झाले आहेत. मात्र आता तिच्या कार्यक्रमांवर बंदी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.