‘आता नव्या सहकाऱ्यांचा शोध…’, झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन करणार पुढील खेळीची घोषणा

रांची – झारखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय नाटक सुरू आहे. येत्या एका आठवड्यात पूर्ण चित्र स्पष्ट होईल असे संकेत इशारे करत राज्याचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी दिले आहेत. झारखंड मुक्ती मोर्चा या झारखंडमधील सत्ताधारी पक्षात मोठे बंड होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे मात्र पक्षाने अद्याप याबाबत काही प्रतिक्रिया दिलेली नाही.
तथापि, झारखंड मुक्ती मोर्चाचा सत्तेतील भागिदार असलेल्या पक्षाने मात्र चंपाई सोरेन यांना लक्ष्य केले आहे. कॉंग्रेसने त्यांना खुर्चीचे लोभी म्हटले आहे. असे असले तरी पक्षात फूट पाडायचा आपला विचार नसल्याचे चंपाई सोरेन यांनी स्पष्ट केले आहे.
टाटा कांड्रा मार्गावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बोलताना चंपाई सोरेन म्हणाले आपण आपल्या सहकाऱ्यांशी सल्लामसलत केली आहे. दरम्यान, दादा तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा त्यांचे समर्थक देत होते. जनतेकडून मिळत असलेल्या पाठिंब्यामुळेही चंपाई यांच्यात उत्साह संचारला आहे.
ते म्हणाले की पक्षाने भलेही त्यांच्यासोबत गैरव्यवहार केला असेल, मात्र ते पक्ष फोडणार नाही व त्यांची तशी इच्छा नाही. कोणताही खासदार, आमदार अथवा मंत्र्याला फोडायचा आपला विचार नाही. तथापि, ज्या नेत्यांची या प्रवासात आमच्यासोबत येण्याची व चालण्याची इच्छा आहे त्यांचे स्वागत आहे.
दरम्यान, सोरेन यांच्या स्वागतावेळी महिलांमध्ये विशेष उत्साह होता. त्यामुळे भावूक झालेले सोरेन म्हणाले ज्या प्रकारे पाठिंबा मिळाला आहे ते कदापि विसरता येणार नाही. आपल्या पुढील खेळीची घोषणा आपण आठवडाभराच्या आत करू. पृष्ठभूमी तयार झाली असून लवकरच पूर्ण विषयाला पूर्णविराम दिला जाईल. आपल्या आता नव्या सहकाऱ्यांचा शोध घ्यायचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.





