“छत्रपती’ची युती टिकणार की तुटणार..? चर्चेला उधाण…; पृथ्वीराज जाचक यांची वेगळी वाट

भवानीनगर – श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनल 1 मे रोजी जाहीर करणार असल्याचे लासुर्णे येथे सभा घेऊन सर्व कार्यकर्ते व सभासदांच्या उपस्थितीत साखर संघाचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी जाहीर केले. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार व साखर संघाचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांची युती तुटली आहे का? याची चर्चा कारखाना कार्यक्षेत्रामध्ये सुरू झाली आहे.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यामध्ये युती होऊन श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पाच वर्ष अध्यक्षपदाची धुरा पृथ्वीराज जाचक यांच्याकडे सोपवली जाईल, असे सर्वपक्षीय मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले होते; परंतु काल मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व अल्पसंख्यांक मंत्री दत्तात्रय भरणे व पृथ्वीराज जाचक यांच्यामध्ये मुंबई या ठिकाणी कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारांच्या जागा संदर्भात चर्चा झाली.
या चर्चेमध्ये ज्या जागा पृथ्वीराज जाचक यांना देण्यात आल्या, त्या जाचक यांना मान्य नसल्याने व ज्या जागा पृथ्वीराज जाचक यांनी उमेदवारासाठी सुचवल्या त्या न देता दुसर्याच व्यक्तीचे नाव सांगून त्यांना घेण्यात यावे अशी भूमिका मांडली. पृथ्वीराज जाचक यांना श्री छत्रपती संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये ज्या उमेदवारांना जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला, तो फॉर्म्युला जाचक यांना मान्य झाला नाही.
आज लासुर्णे या ठिकाणी सर्वपक्षीय बैठक घेऊन पृथ्वीराज जाचक यांनी येणार्या 1 मे रोजी पॅनल जाहीर करणार असल्याचे जाहीर केले. जाचक म्हणाले, छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या भल्यासाठी मी काहीही करायला तयार आहे; परंतु माझी मान मी दुसर्याच्या हातात देणार नाही. यानंतर उपस्थित असलेल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी व शेतकरी सभासदांनी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी जो काही निर्णय पृथ्वीराज जाचक घेतील तो आम्हाला मान्य असून त्यांच्या पाठीमागे आम्ही सर्वपक्षीय कार्यकर्ते एकमताने उभे राहू, असे आश्वासन देऊन उपस्थित सर्वांनी हात उंचावून जाचक यांना पाठिंबा दर्शवला आहे.
या बैठकीला शिवाजीराव निंबाळकर, सतीश काटे, विशाल निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटील, अॅड. जामदार, अॅड. नरूटे, शहाजी शिंदे, रामचंद्र निंबाळकर, संतोष चव्हाण, प्रकाश नेवसे आबासाहेब निंबाळकर तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते व सभासद शेतकरी उपस्थित होते.
श्रीनिवास पवार यांची साथ
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तसेच श्रीनिवास पवार यांची पूर्णपणे साथ पृथ्वीराज जाचक यांना मिळेल असे ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटील यांनी दिली.


