Q3 Results : डिसेंबर तिमाहीत Bharat Forgeचा 223% वाढला नफा, महसूलात 16% वाढ

Bharat Forge Q3 Results : अग्रगण्य फोर्जिंग फर्म भारत फोर्ज लिमिटेडने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 223 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीला 254.45 कोटी रुपयांचा नफा झाला आहे, तर गेल्या वर्षी याच तिमाहीत हा आकडा 78.71 कोटी रुपये होता. निकालादरम्यान कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 14 टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे. सध्या हा शेअर 1,131.10 रुपयांच्या किमतीवर व्यवहार करत आहे.
भारत फोर्जच्या महसुलात सुमारे 16% वाढ –
डिसेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल 15.7 टक्क्यांनी वाढून 3922.96 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ते 3389.95 कोटी रुपये होते. कंपनीच्या संरक्षण व्यवसायाने महसुलात चांगली वाढ नोंदवली आहे, तर तेल , वायू आणि कृषी क्षेत्रात वर्षभरापूर्वीच्या तुलनेत घट झाली आहे.
कंपनीचा EBITDA 30.9% ने वाढून 645 कोटी रुपये झाला, EBITDA मार्जिन 28.5% पर्यंत वाढला. 1,000 कोटी रुपयांच्या रोख साठ्यासह ताळेबंद मजबूत आहे. कंपोनेंट्स, डिफेंस आणि इंडस्ट्रियल सेक्टर्स क्षेत्रातील भारतीय उत्पादन ऑपरेशन्समधील निर्यात Q3 FY24 मध्ये 20 कोटी डाॅलरपर्यंत पोहोचली आहे, Q3 FY23 च्या तुलनेत 36% ने वाढ झाली आहे.
कंपनीला अपेक्षा आहे की हा आकडा आणखी वाढेल आणि औद्योगिक क्षेत्रात आपली उपस्थिती मजबूत करेल. या तिमाहीत, कंपनीने अनेक क्षेत्रांमध्ये 550 कोटी रुपयांचा नवीन व्यवसाय साधला आहे. कंपनीने म्हटले आहे की त्यांचे लक्ष विदेशी व्यवसायात ॲल्युमिनियम आणि स्टील क्षेत्रातील सुधारणांद्वारे शाश्वत नफा मिळवण्यावर आहे, जे पुढील 12-18 महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
भारत फोर्जकडून लाभांश जाहीर –
भारत फोर्ज लिमिटेडने प्रति शेअर 2.5रुपये असा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. मुदत कर्ज, डिबेंचर किंवा इतर कोणत्याही कर्ज साधनाद्वारे 500 कोटी रुपयांचा निधी उभारण्यासही मान्यता दिली आहे. दीपक माने यांची अकार्यकारी स्वतंत्र संचालक म्हणून पुढील पाच वर्षांसाठी पुनर्नियुक्ती करण्यासही मंडळाने मान्यता दिली आहे.



