Baban Gite : धनंजय मुंडेंशी पंगा; वाल्मिक कराडशी दंगा, बबन गीतेची राजकीय आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी काय?

Baban Gite : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला आणि त्याच्या गँगमधील पोरांना बीड जिल्हा कारागृहात मारहाण करण्यात आल्याची घटना सोमवारी घडली. बीडच्या कारागृहात सकाळी कैद्यांच्या दोन गटात जोरदार राडा झाला. यावेळी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण करण्यात आली. याबाबत आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली होती. (Baban Gite on Walmik karad)
दरम्यान, बबन गिते याच्या टोळीतील समर्थक कैद्यांकडून वाल्मिक आणि सुदर्शन घुले याला मारहाण झाल्याचे वृत्त आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आरोपाखाली गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून वाल्मिक कराडसह त्याची आठ जणांची टोळी बीडच्या तुरुंगात आहे. याच तुरुंगात बबन गिते याचे समर्थक कैदीही आहेत.
पूर्वीच्या राजकारणात दोन्ही गँगमध्ये बऱ्याचदा राजकारणावरून चकमकी उडाल्या होत्या. तसेच अनेक मुद्द्यांवर त्यांचे मतभेद होते. हेच मतभेद आजच्या वादावादीला कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. परंतु बबन गिते एका खून प्रकरणात फरार असूनही त्याच्या समर्थक कैद्यांनी वाल्मिक कराडच्या कानशिलात कशी लगावली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रकरणात बबन गिते पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
कोण आहे बबन गिते ?
बबन गिते हा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचा आणि दबदबा असलेला नेता मानला जातो. वंजारी समाजातून येत असल्याने मोठी सामाजिक ताकद त्याच्या पाठीशी आहे. परळी तालुक्यात त्याला मानणारा मोठा वर्ग आहे. त्याची पत्नी परळी पंचायत समितीची विद्यमान सदस्य असून, यापूर्वी त्यांनी सभापतीपदही भूषवले आहे, यावरून त्याचे स्थानिक राजकारणातील वजन दिसून येते. (Baban Geete)
परळीच्या राजकारणात स्थान काय?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आणि धनंजय मुंडे यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर परळीमध्ये धनंजय मुंडे यांना पर्याय म्हणून बबन गितेचे नाव समोर येऊ लागले. बबन गितेनेही आक्रमक भूमिका घेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची तयारी सुरू केली. (political and criminal background)
विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी तब्बल ७०० गाड्यांचा भला मोठा ताफा घेऊन मुंबईत पक्षप्रवेश करण्याची योजना आखली. हा ताफा आणि समर्थकांची गर्दी पाहून तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील प्रभावित झाले होते. शरद पवार आणि जयंत पाटील यांनी बबन गितेला बळ देण्याचे ठरवले. धनंजय मुंडे यांना पर्याय म्हणून त्यांचे चेहरा प्रोजेक्ट करण्याचे राष्ट्रवादी पवार गटाचे नियोजन होते.
बापू आंधळेचा खून आणि बबन गिते फरार
दरम्यान, मरळवाडीचे सरपंच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बापू आंधळे यांचा खून झाला. भर दिवसा त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या खुनाचा आरोप बबन गिते यांच्यावर ठेवण्यात आला. बबन गिते याच्यासह मुकुंद गिते, महादेव गिते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून बबन गिते फरार आहे. तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे त्याचा शोध घेण्याची प्रक्रियाही मंदावली होती. मात्र, आता बीड जिल्हा कारागृहातील हाणामारीमुळे बबन गिते पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (Valmik Karad)
मारहाणीनंतर बबन गिते याची फेसबुक पोस्ट व्हायरल
वाल्मिक कराड याला तुरुंगात झालेल्या मारहाणीनंतर बबन गिते याची फेसबुक पोस्ट व्हायरल झाली आहे. ‘अंदर मारना या मरना सबकुछ माफ है’, असा मजकूर या पोस्टमध्ये लिहला आहे. बापू आंधळे खून प्रकरणात बबन गित्ते गेल्या 9 महिन्यांपासून फरार आहे. तो सोशल मीडियावर पोस्ट शेअर करतो मात्र पोलिसांच्या हाती लागत नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा बीड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (Dhananjay Munde)
कराड आणि गीते दोघांनीचा एकमेकांना मारण्यासाठी प्रण?
दरम्यान, वाल्मिक कराड पायात चप्पल घालत नव्हता. कदाचित देवाचा नवस वगैरे असल्याने तो पायात चप्पल घालत नाही, असा अनेकांचा समज होता. मात्र, जोवर बबन गितेला संपविणार नाही तोवर पायात चप्पल घालणार नाही, असा प्रण त्याने केला होता. याउलट जोवर वाल्मिक कराडला संपविणार नाही, तोवर दाढी काढणार नाही, असा निर्धार बबन गितेने केला होता, असे अगदी स्पष्टपणे भाजप आमदार सुरेश धस यांनी माध्यमांना सांगितले. आजवर दोघांबद्दलच्या संघर्षाची दबक्या आवाजात होणारी चर्चा सुरेश धस यांच्या जाहीर वक्तव्याने खुलेपणाने झाली.





