अंधेरी पोटनिवडणुकीत ठरतोय ‘हा’ कळीचा मुद्दा; ठाकरे गटाला काॅंग्रेसचा हातभार मिळणार का?

मुंबई – अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीला संपूर्ण राज्यातील राजकारणाच्या दृष्टीने मोठे महत्व प्राप्त झाले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटासाठी ती पोटनिवडणूक पक्षातील फुटीनंतर महत्वाची आणि पहिली परीक्षा ठरणार आहे. कॉंग्रेस समर्थकांची मतं ठाकरे गटाकडे वळणार का, हा त्या पोटनिवडणुकीतील कळीचा मुद्दा बनला आहे.
शिवसेनेच्या तिकिटावर सलग दोन वेळा विजयी झालेले आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ती पोटनिवडणूक होत आहे. ठाकरे गटाने लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा सामना भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्याशी होईल. ठाकरे गटाच्या पाठिशी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे पक्ष उभे राहिले आहेत. तर, भाजप उमेदवाराला शिवसेनेच्या दुसऱ्या शिंदे गटाने पाठिंबा दिला आहे. शिंदे गटाने आपला उमेदवार न दिल्याने पोटनिवडणुकीत खऱ्याअर्थी ठाकरे गटाची आणि भाजपचीच राजकीय प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीतील दोन्ही उमेदवारांची संपत्ती जाहीर; संपत्ती आणि शिक्षणात मोठा फरक https://t.co/iyW6wWC7sN
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 15, 2022
याआधी अंधेरी पूर्व मतदारसंघात भाजपचा विजय झाला नसल्याने पोटनिवडणुकीत त्या पक्षाकडे गमावण्यासारखे फारसे काही नसेल. मात्र, तो मतदारसंघ आपल्याकडे कायम ठेवण्याचे मोठे आव्हान ठाकरे गटापुढे आहे. त्या मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या सुमारे 2 लाख 78 हजार इतकी आहे. त्यामध्ये एक-तृतीयांश प्रमाण मराठी मतदारांचे आहे.
तो घटक आतापर्यंत शिवसेनेसाठी पोषक ठरला होता. मात्र, शिवसेनेतील फुटीनंतर मराठी मतांमध्ये फाटाफूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ठाकरे गटाची भिस्त कॉंग्रेस समर्थकांच्या मतांवर असेल. त्या मतदारसंघातील मुस्लिम मतदार ठाकरे गटाला झुकते माप देणार का, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरेल. अंधेरी पूर्व मतदारसंघात गुजराती, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय आणि ख्रिश्चन मतदारांचे प्रमाणही लक्षणीय आहे.
भाजपला मोठा धक्का; “हे’ माजी मंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश https://t.co/x7gyat25Hd
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 15, 2022
अंधेरी पूर्व मतदारसंघात 2009 मधील निवडणुकीत कॉंग्रेसच्या सुरेश शेट्टी यांनी विजय मिळवला. त्यानंतर सलग दोन निवडणुकांत लटके विजयी झाले. मागील निवडणुकीत (2019) लटके यांना 62 हजारांहून अधिक मते मिळाली. त्यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या मुरजी पटेल यांनी चांगली लढत दिली.
पटेल यांनी 45 हजारांहून अधिक मते घेतली. आता ते थेट भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ठाकरे गटापुढे ते मोठे आव्हान उभे करू शकतात. मागील निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या कॉंग्रेसच्या अमिन कुट्टी यांनी जवळपास 28 हजार मते खेचली. त्यामुळे त्या मतदारसंघात कॉंग्रेसचीही बऱ्यापैकी ताकद असल्याचे दिसते. ती ताकद ठाकरे गटाला मोठा हातभार लावणारी ठरू शकते.
भाजप उमेदवार मुरजी पटेल 6 वर्ष निवडणूक लढवू शकत नाहीत, उमेदवारी रद्द होणार?, ठाकरे गटानं घेतला आक्षेपhttps://t.co/N5mGP8mfSg
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 15, 2022





