नवी दिल्ली : टाटा मोटर्स पाठोपाठ आता ऑलकार्गो लॉजिस्टिक्स (Allcargo Logistics) कंपनीनेही आपला आंतरराष्ट्रीय व्यवसाय वेगळा (डिमर्जर) करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने १ नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय सप्लाय चेन आणि देशांतर्गत व्यवसाय वेगळे करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे शेअरधारकांना मोठा लाभ होणार आहे. ऑलकार्गो लॉजिस्टिक्सने सोमवारी (१ नोव्हेंबर) आंतरराष्ट्रीय सप्लाय चेन आणि देशांतर्गत (डोमेस्टिक) व्यवसायाचे विभाजन झाल्याचे जाहीर केले, जे तात्काळ प्रभावाने लागू झाले आहे. देशांतर्गत एक्सप्रेस डिस्ट्रिब्युशन आणि कन्सल्टिंग लॉजिस्टिक्स व्यवसायाचे ऑलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेडमध्ये (Allcargo Logistics Limited) विलीनीकरण केले जाईल. शेअरधारकांसाठी काय? राष्ट्रीय कंपनी विधि अधिकरण (NCLT) च्या मुंबई खंडपीठाने १० ऑक्टोबर रोजी या योजनेला मंजुरी दिली होती. कंपनीच्या संचालक मंडळाने १२ नोव्हेंबर ही ‘रेकॉर्ड डेट’ निश्चित केली आहे. पुनर्रचनेनंतर, ऑलकार्गो लॉजिस्टिक्सच्या शेअरधारकांना ऑलकार्गो लॉजिस्टिक्स (Allcargo Logistics) आणि डिमर्ज झालेल्या ऑलकार्गो ग्लोबल (Allcargo Global) या दोन्ही कंपन्यांमध्ये १:१ च्या प्रमाणात प्रत्येकी एक शेअर मिळेल. याव्यतिरिक्त, ऑलकार्गो गती लिमिटेड (Allcargo Gati Limited) चे शेअर असलेल्या भागधारकांना त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक १० शेअर्सच्या बदल्यात ऑलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेडचे (डिमर्जरनंतर) ६३ शेअर्स मिळणार आहेत. या घोषणेनंतर कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली, ज्यामुळे बाजार भांडवल ३,४५७.४३ कोटी रुपयांवर पोहोचले.