तृतीयपंथीयांच्या नाचात अर्भकाचा मृत्यू

प. बंगालमध्ये संतापाची भावना
कोलकाता : नवजात अर्भकाला आईच्या कुशीतून ओढून घेत तीन तृतीयपंथीयांनी नाचण्यास सुरवात केली. त्यात त्या बाळाचा मृत्यू झाला. प. बंगालमध्ये शुक्रवारी घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
झारग्राम जिल्ह्यातील उत्तर शिल्डा येथे चंदन खैलादी यांना चार डिसेंबरला जुळे झाले. त्यातील एका अर्भकाला हृदयविकार असल्याने 20 दिवस रुग्णालयात ठेवण्यात आले. त्यांना बुधवारी घरी आणण्यात आले.
शुक्रवारी तीन तृतीय पंथी त्यांच्या घरी पोहोचले. त्यांनी बाळाच्या मातेच्या कुशीतून अर्भकाला हिसकावून घेत त्याला घेऊन नाचायला सुरवात केली. त्यांनी कुटुंबियांकडे 11 हजार रुपयांची मागणी केली. अखेर दोन हजार दिल्यानंतर त्यांनी बाळाला सोडले.
बाळ बेशुध्द पडले होते. त्यामुळे त्याला दवाखान्यात नेण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर घटनास्थळावरून या तृतीयपंथीयांनी पोबारा करण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांनी पकडून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.





