देशव्यापी संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद; बंगालमध्ये हिंसाचाराचे गालबोट

नवी दिल्ली/ कोलाकता : केंद्र सरकारच्या रयतद्वेष्ट्या धोरणाविरोधात बुधावारी कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपात सुमारे 25 कोटी कामगार देशभरात सहभागी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. काही राज्यांमध्ये राजकीय पक्षांनी या संपाला पाठींबा दिला आहे. या संघटनांनी केंद्र सरकारने अलीकडेच लागू केलेल्या सुधारीत नागरिकत्व कायद्याला (का) विरोध केला आहे. या संपाला देशभरात उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. देशभरात नागरिक सवयंस्फूर्तीने त्यात सहभागी होत आहेत.
भेल या सरकारी संस्थांमधील कर्मचारी या संस्थात सहभागी झाल्या आहेत. ईशान्य भारत, ओदिशा, पुदुचेरी, केरळा आणि महाराष्ट्रात बंदसारखी स्थिती आहे, असे एआयटीयुसीच्या सरचिटणीस अमरजीत कौर यांनी सांगितले. दरम्यान कोलकात्यातून आलेल्या वृत्तानुसार, पश्चिषम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.
कूच बेहर येथे बसची नासधूस केल्याचे वृत येत आहे. प. बंगालमध्ये संप समर्थकांनी रेल्वे आणि रस्ते वाहतूक अनेक ठिकाणी रोखल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूर्व वर्धमान जिल्ह्यात रस्त्यावर टायर्स पेटवून वाहतूक रोखण्यात आली. अनेक ठिकाणी रेल्वे मार्गावर आंदोलकांनी ठिय्या मांडल्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली. पूर्व मिदनापूर जिल्ह्यात बसवर तुफानी दगडफेक करण्यात आली. अनेक निदर्शकांची पोलिसांनी धरपकड केल्याचे वृत्त आहे. जाधवपूर विद्यापीठ आणि सेंट्रल ऍव्हेन्यू इमारतीत आंदोलकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी बळाचा वापर केला.
दम दम आणि लेक टाऊन भागात तृणमूल आणि कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना संघर्ष उडाल्याचे वृत्त असून अनेक जण जखमी झाले आहेत. उत्तर 24 परगणा जिल्ह्यात अनेक क्रुड बॉम्ब रस्त्यावर सापडल्याचे समजते. तेथे मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तोलीगंज, बेहला, इसप्लांडे आणि जाधवपूर भागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.





