Newasa News : नेवाशात दरोडेखोर गजाआड, पण लुटलेला ऐवज कुठे? पोलिसांच्या कारवाईवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह
नेवासे शहर (Newasa News) आणि उस्थळ रस्त्यावर गेल्या काही दिवसांत घडलेल्या सलग चोऱ्या आणि धाडसी दरोड्यांमुळे संपूर्ण परिसर दहशतीच्या छायेत वावरत आहे.

Newasa News : नेवासे शहर (Newasa News) आणि उस्थळ रस्त्यावर गेल्या काही दिवसांत घडलेल्या सलग चोऱ्या आणि धाडसी दरोड्यांमुळे संपूर्ण परिसर दहशतीच्या छायेत वावरत आहे. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे उस्थळ रस्त्यावरील कदम वस्ती येथे विजय गोरक्षनाथ कदम यांच्या घरावर पडलेला दरोडा अंगावर काटा आणणारा होता.
फिर्यादीचे हात-पाय बांधून, लोखंडी गज व काठ्यांनी बेदम मारहाण करत १ लाख २७ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटून नेण्यात आली होती. या घटनेनंतरही शहरात चोऱ्यांचे सत्र थांबले नाही, उलट तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जाणाऱ्या नागरिकांनाच (Newasa News) उलटतपासणीचा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप झाला. पोलिसांची रात्रगस्त, सीसीटीव्ही यंत्रणा आणि खबऱ्यांचे जाळे यावर प्रश्न उपस्थित करत “आम्ही सुरक्षित आहोत का?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत होते.
वाढत्या जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर नेवासे पोलिसांनी अखेर एका कारवाईची बातमी समोर आणली. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील व पथकाने नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथून संतोष भगवान काळे (वय ४२, रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सापळा रचून ताब्यात घेतले.
साक्षीदारांकडून फोटो ओळख, तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या माहितीवरून ही कारवाई झाल्याचे सांगण्यात आले. आरोपी हा कर्नाटक आणि येवला येथील दरोडा व खूनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यांतील सराईत असून त्याने नेवासे व कोपरगाव परिसरातील गुन्ह्यांची कबुली दिल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
पोलिसांनी या कारवाईचा मोठा गाजावाजा केला असला, तरी घटनेचे मूळ कोडे अजूनही अनुत्तरितच राहिले आहे. या गुन्ह्यातील लुटलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम नेमकी कुठे गेली, याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही स्पष्टता दिलेली नाही.
आरोपीकडून प्रत्यक्ष मुद्देमाल (Newasa News) जप्त झाला आहे का? आणि झाला असल्यास तो किती? यावर पोलीस यंत्रणेने मौन बाळगले आहे. केवळ कबुली जबाबाच्या आधारे न्यायालयात गुन्हा सिद्ध होणे कठीण असते, तपासात प्रत्यक्ष मुद्देमाल हस्तगत होणे हाच सर्वात भक्कम पुरावा मानला जातो, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे पकडलेला संशयित खरोखर याच दरोड्यातील आहे की केवळ दबाव कमी करण्यासाठी जुन्या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर हा गुन्हा खपवला जात आहे, अशी तीव्र शंका नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
या सगळ्या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांचा असंतोष अधिकच उफाळून आला आहे. ‘चोर सापडला तर लुटलेला ऐवज कुठे आहे?’ असा रोखठोक जाब विचारत नेवासकरांनी आता आरपारच्या लढ्याची तयारी सुरू केली आहे.
‘बाप दाखवा अन्यथा श्राद्ध घाला’ अशी थेट भूमिका घेत, पोलिसांनी लुटलेला मुद्देमाल (Newasa News) जनतेसमोर आणावा आणि टोळीतील उर्वरित साथीदारांचा छडा लावावा, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा नागरिकांनी दिला आहे.






