Newasa : ‘निवडणुकांपुरतेच राजकारण; जनतेच्या कामांना कायम प्राधान्य’ – आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील
Newasa : नेवासा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही

Newasa : ‘हात दाखवा आणि गाडी थांबवा’ ही भूमिका स्वीकारून सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत असल्याचे सांगत, राजकारण केवळ निवडणुकांपुरते मर्यादित ठेवून जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याची ग्वाही आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी दिली. नेवासा तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शिरसगाव (ता. नेवासा) येथे आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील मित्रमंडळाच्या वतीने आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कामगार आयुक्त रेवननाथ बिसले होते. प्रमुख पाहुणे म्हणून त्रिवेणीश्वरचे महंत रमेशानंदगिरी महाराज, माजी आमदार पांडुरंग अभंग, नेवासा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक काशिनाथ नवले, अमित धाडगे, हरिभाऊ लंघे, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अंकुश काळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
आमदार लंघे-पाटील म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांच्या पाठबळामुळेच राजकीय वाटचाल शक्य झाली असून चाळीस वर्षांच्या संघर्षानंतर विधानसभेत जाण्याची संधी मिळाली. सत्तेत असो वा नसो, शेतकरी, कष्टकरी आणि वंचित घटकांसाठी कायम कार्यरत राहणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
शैक्षणिक योजनांमधून विद्यार्थ्यांसाठी सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यात आल्याचे सांगितले. पुनर्वसित २६ गावांसाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून ग्रामीण भागातील कामगारांनाही विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. मागील अर्थसंकल्पातून मंजूर झालेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीतून तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामे मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पाणंद रस्त्यांच्या प्रश्नासाठी शासनाने स्थापन केलेल्या समितीवर सदस्य म्हणून काम करत असून तालुक्यातील पाणंद रस्त्यांचे प्रश्नही लवकरच निकाली काढले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकरी कुटुंबातून आल्याने त्यांच्या अडचणींची जाणीव असून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी आपण शासनाकडे केल्याचे त्यांनी नमूद केले.
तालुक्यातील धार्मिक स्थळांचा विकास झाल्यास पर्यटनाला चालना मिळेल, असे सांगत ज्ञानेश्वर मंदिराच्या विकासासाठी सुमारे ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाचा विकास आराखडा तयार असून लवकरच विकासकामांना प्रारंभ होईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा असून ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दहा लाख रुपयांपर्यंत उपचाराचा लाभ मिळतो. नागरिकांनी आयुष्मान कार्ड काढून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांनी आमदार लंघे-पाटील हे अभ्यासू नेतृत्व असून त्यांनी विधानसभेत जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडल्याचे सांगत भविष्यात त्यांना राज्याच्या नेतृत्वाची संधी मिळावी, अशा शुभेच्छा दिल्या.
माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार लंघे-पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे ज्ञानेश्वर मंदिराच्या दिंडी सोहळ्याला देहू-आळंदी पालखीप्रमाणे दर्जा मिळाल्याचे सांगितले. वारकऱ्यांच्या सुविधांसाठी १२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
पर्यावरण सप्ताहानिमित्त बालाजी देडगाव येथील युवक मच्छिंद्र मुंगसे यांनी राबविलेल्या ‘गाव तेथे वृक्षारोपण’ मोहिमेचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय पोटे यांनी केले, तर आभार संजय लंघे यांनी मानले.





