Newasa News : जळके बुद्रूक येथून दोन एकर तुरीच्या पिकाची चोरी; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

नेवासे : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील जळके बुद्रूक येथे शेतकरी ज्ञानेश्वर सिताराम जाधव (वय ५१, रा. वरखेड, ता. नेवासे) यांच्या दोन एकर तीन गुंठे शेतातील सवंगणी (पूर्ण वाढलेले) तुरीचे पीक अज्ञात चोरट्यांनी हार्वेस्टर मशीनच्या साहाय्याने कापणी करून चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी नेवासे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे.
घटनेचा सविस्तर तपशील असा की, ज्ञानेश्वर जाधव यांच्या मालकीच्या गट नंबर ८/३ मधील ८३ गुंठे शेतजमिनीत जून २०२५ मध्ये तुरीची पेरणी केली होती. ही जमीन त्यांच्याशी सोपान सावळेराम पाठे (रा. जळके बुद्रूक) यांच्यात नेवासे न्यायालयात दिवाणी दावा प्रलंबित आहे. २६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शेतात कामासाठी गेले असता जाधव यांना त्यांच्या तुरीचे पीक पूर्णपणे गायब झाल्याचे आढळले. शेतात हार्वेस्टर मशीनच्या चाकांच्या खुणा दिसून आल्याने चोरीची खात्री पटली.
चोरट्यांनी सुमारे ८ क्विंटल तूर (प्रति क्विंटल ६ हजार रुपये दराने एकूण ४८ हजार रुपये किंमतीची) चोरून नेली आहे. याबाबत जाधव यांनी नेवासे पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी (३० डिसेंबर २०२५) प्रवरासंगम पोलीस चौकीचे बीट हवालदार समीर शेख आणि पोलीस हवालदार सुधाकर दराडे यांनी जळके बुद्रूक येथे घटनास्थळी भेट देऊन शेताची पाहणी करून पंचनामा पूर्ण केला.
सध्या शेतपीक चोरीच्या घटना वाढत असल्याने शेतकरी वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. प्रवरासंगम पोलीस अधिक तपास करत आहेत. चोरट्यांचा लवकरच छडा लागेल, अशी अपेक्षा शेतकरी जाधव यांनी व्यक्त केली आहे.





