Newasa : नेवासा-श्रीरामपूर पुलासाठी 100 कोटींची मागणी; आमदार विठ्ठलराव लंघेंचा विधानसभेत पाठपुरावा
Newasa : देवगड पूल, नगरपंचायत इमारत व आयटीआयसाठीही निधीची मागणी; पावसाळी अधिवेशनात अनेक प्रश्नांद्वारे सरकारचे लक्ष वेधले

Newasa : नेवासा तालुक्यातील विविध प्रलंबित विकासकामांसाठी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारचे लक्ष वेधत भरघोस निधीची मागणी केली. विशेषतः नेवासे-श्रीरामपूर मार्गावरील जीर्ण पुलाच्या पुनर्बांधणीसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी त्यांनी विधानसभेत केली.
सुमारे ६० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला नेवासे-श्रीरामपूर मार्गावरील पूल अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत असून, या पुलाऐवजी नवीन पूल उभारण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी लंघे-पाटील यांनी केली. हा पूल नेवासे आणि श्रीरामपूर तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याने त्याच्या पुनर्बांधणीची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
याशिवाय, नेवासे नगरपंचायतीच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी फर्निचर व इतर आवश्यक सुविधांसाठी निधीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले. आवश्यक निधी तातडीने मंजूर करून नगरपंचायतीचे कामकाज नव्या इमारतीत सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली.
देवगड पुलाच्या बांधकामासाठी तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करताना या पुलामुळे १३ गावांचा संपर्क सुलभ होणार असून विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी गैरसोय दूर होईल, असे त्यांनी सांगितले.
नेवासा फाटा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची (आयटीआय) विद्यमान इमारत अपुरी पडत असल्याने त्यावर दुसरा मजला बांधण्यासाठीही निधी मंजूर करण्याची मागणी लंघे-पाटील यांनी केली. विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता संस्थेच्या पायाभूत सुविधांचा विस्तार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.





