Newasa News : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही गुणात्मक आणि संख्यात्मक दृष्ट्या मोठी संघटना – संजय बनसोडे

नेवासा (राजेंद्र वाघमारे) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही समाजातील विविध घटकांचा व्यापक लोकआधार असलेली गुणात्मक आणि संख्यात्मकदृष्ट्या मोठी संघटना बनली असल्याचे प्रतिपादन राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी केले. चळवळीला ३६ वर्षे पूर्ण झाली असून, राज्यभरात ३६ जिल्ह्यांमध्ये ३७५ हून अधिक शाखा कार्यरत आहेत, तसेच ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ पत्रिकेचे ७ हजाराहून अधिक सभासद आहेत.
नेवासे तालुक्यातील सौंदळा येथे मंगळवार दि. 26 डिसेंबर रोजी दुपारी कॉम्रेड बाबा आरगडे यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते मार्गदर्शन करताना बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य सल्लागार कॉम्रेड बाबा आरगडे होते.
बनसोडे पुढे म्हणाले, ‘‘संघटनेचे कामाचे स्वरूप सतत वाढत आहे. सध्याची सामाजिक-राजकीय परिस्थिती प्रतिकूल असली तरी धर्मांध शक्तींविरुद्ध संघर्षाची वेळ आली आहे. प्रतिकूल परिस्थितीतच खरे काम घडते. दबलेल्या-पिचलेल्या समाजातच चळवळी मोठ्या होतात. प्रबोधन, कृती आणि संघर्ष या त्रिसूत्रीवर आपले काम सुरू आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंदराव पानसरे आणि कॉम्रेड बाबा आरगडे यांसारख्या समर्पित व्यक्तींच्या प्रेरणेतून प्रश्न विचारणारी संस्कृती निर्माण करणे, समाजात विवेकवाद रुजवणे आणि बुवाबाजीला ठाम विरोध करणे हे आपले कर्तव्य आहे.’’
राज्य प्रधान सचिव ॲड. रंजना गवांदे म्हणाल्या, ‘‘शाखा भेटींचा मुख्य उद्देश नवीन सभासद नोंदणी, शाखा कार्यकारी मंडळाची निवड, चळवळीचे मुखपत्र असलेल्या पत्रिकेचे सभासद वाढवणे, तरुण कार्यकर्ते जोडणे आणि महिलांचा सहभाग वाढवणे हा आहे.’’
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब बुधवंत, जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड, जिल्हा प्रधान सचिव विनायक सापा, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सुखदेव फुलारी, बुवाबाजी संघर्ष विभाग जिल्हा कार्यवाह शशिकांत गायकवाड, विविध उपक्रम विभाग जिल्हा कार्यवाह बी.के. चव्हाण, अमृत काळे, नेवासा शाखा उपाध्यक्ष बाळासाहेब आरगडे, भाऊसाहेब सावंत, भाऊसाहेब गोर्डे, सरपंच शरद आरगडे, संजय आरगडे, सुधाकर नवथर, नानासाहेब खराडे, सूर्यकला आरगडे, प्रियंका आरगडे, क्रांती आरगडे, संग्राम आरगडे आदी उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बुधवंत, शरद आरगडे आणि विष्णू गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. भाऊसाहेब सावंत यांनी प्रस्ताविक केले, तर बाळासाहेब आरगडे यांनी आभार मानले.





