नेवासा : नेवासा शहरातील ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्याने शहरवासीयांना विकासाची अपेक्षा होती, परंतु मूलभूत समस्यांवर तोडगा निघाला नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. गटारींची दुर्गंधी, अरुंद रस्ते, अनियमित पाणीपुरवठा आणि विकासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा कागदोपत्री खर्च यामुळे नेवासा शहराची अवस्था ‘नाव मोठे, लक्षण खोटे’ अशी झाल्याची टीका नागरिक करत आहेत. नगरपंचायतीच्या प्रत्येक शाखेत विकासाच्या नावाने कोट्यवधींचा खर्च दाखवला जात असला, तरी शहरातील समस्या जैसे थे’च आहेत. करवाढीचा बोजा नागरिकांवर पडला असून, विकासाच्या नावाने फक्त कागदी घोडे नाचवले जात असल्याचा आरोप होत आहे. सतरा प्रभागांतील गटारी, रस्ते आणि पाणीपुरवठ्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक संतप्त आहेत. कोरोना आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या, त्यामुळे नगराध्यक्ष आणि नगरसेवक माजी झाले असून, सत्ता अधिकाऱ्यांच्या हातात आहे. यामुळे शहरातील समस्यांचा कोणीच वाली नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नेते निवेदनांचा फार्स करत असले, तरी नागरिकांचा प्रशासन आणि स्थानिक नेत्यांवर विश्वास उरलेला नाही. नेवासा शहर विकासाच्या मार्गावर येणार की भकासच राहणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.