Newasa News : बेकायदेशीर डीजे, लाउडस्पीकर आणि ड्रोनवर होणार कठोर कारवाई

नेवासा : नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी बेकायदेशीर लाउडस्पीकर, डीजे आणि ड्रोन उड्डाण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. रविवारी (१८ मे २०२५) माध्यमांशी बोलताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न करणाऱ्यांवर ध्वनी प्रदूषण कायदा २००० अंतर्गत कडक कारवाई करण्याचे स्पष्ट केले.
खाडे म्हणाले, “ध्वनी प्रदूषणामुळे वृद्ध, लहान मुले, आजारी व्यक्ती आणि अपंगांच्या आरोग्यास हानी पोहोचते. सर्वोच्च न्यायालयाने डीजे वादनावर बंदी घातली आहे. नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत परवानगीशिवाय लाउडस्पीकर किंवा ध्वनीक्षेपक वापरल्यास चालक, मालक आणि आयोजकांवर कायदेशीर कारवाई होईल.”
धार्मिक स्थळे आणि ड्रोनबाबत नियम
नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंदिरे, मशिदी, मदरसे, चर्च, गुरुद्वारे आणि इतर धार्मिक स्थळांनी शासकीय परवानगी घेऊनच मर्यादित स्वरूपात लाउडस्पीकर वापरावे. तसेच, भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आदेशानुसार ड्रोन उड्डाणास मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई होईल, असा इशारा खाडे यांनी दिला.





